स्पर्धा परीक्षेची वारी अर्ध्यात नका

By Admin | Updated: December 19, 2014 00:16 IST2014-12-19T00:01:15+5:302014-12-19T00:16:17+5:30

आशिष पुंडपळ : वेळेचे नियोजन करा, स्वत:ला शिस्त लावो

Do not break the competition exam | स्पर्धा परीक्षेची वारी अर्ध्यात नका

स्पर्धा परीक्षेची वारी अर्ध्यात नका

कोल्हापूर : आषाढी वारीतल्या माणसाला विठ्ठल भेटीची आस असते, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या वारीत तुम्हाला चांगल्या पोस्टरूपी विठ्ठलाचे दर्शन व्हायचे असेल तर ही वारी अर्ध्या वाटेत सोडू नका, संघर्ष प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे अभ्यासात सातत्य, स्वत:वर विश्वास ठेवा आणि वेळेचे नियोजन करा, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण विभागाचे कायदेशीर सल्लागार आशिष पुंडपळ यांनी केले.
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने भास्करराव जाधव वाचनालयाच्या हॉलमध्ये आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत पुंडपळ यांनी ‘कॉलेज जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर विचारपुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी नगरसेवक आदिल फरास होते. यावेळी सहा.आयुक्त शीला पाटील, मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
पुंडपळ म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी तुम्ही स्वत: कोण आहात, तुमच्या आवडी-निवडी काय आहेत हे जाणून घ्या. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वेळेचे नियोजन करा, स्वत:ला शिस्त लावा. आपल्याला काय व्हायचंय हे आधी ठरवले की अभ्यासाची दिशा कळते. एकदा स्पर्धा परीक्षेत उतरलात की पहिल्याच प्रयत्नात यश मिळवता येईल अशारितीने तयारी केली पाहिजे.
ते म्हणाले, वारंवार परीक्षा देत बसले की वेळ वाया जातो आणि एकदा वय निघून गेले की आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला किती कालावधीत यश मिळवायचे हेदेखील निश्चित केले पाहिजे. परिस्थिती माणसाला घडवते आणि बिघडवतेदेखील. स्पर्धा परीक्षा आपल्याला जगायचे कसे हे शिकवते.
या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर गुरूंवर, स्वत:वर विश्वास ठेवा. निर्णयक्षमता, समाजाभिमुखता आणि ज्ञान या तीन गोष्टी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. एकदा चांगली पोस्ट मिळाली की त्यावर थांबू नका. सातत्याने परीक्षा देत राहा, यशाच्या नवनवीन पायऱ्या चढत राहा, असेही ते म्हणाले.
सहा.आयुक्त शीला पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय वणकुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होती.

Web Title: Do not break the competition exam