कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजारावर कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण, पालकमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:16 IST2025-10-28T16:12:58+5:302025-10-28T16:16:04+5:30

महसूलने वेगवेगळ्या १४ विभागांच्या सहाय्याने शोधलेल्या नोंदी व त्यावरील कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले

Distribution of over 30000 Kunbi certificates in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजारावर कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण, पालकमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

संग्रहित छाया

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजवर १ लाख ४० हजार ५३१ कुणबी नोंदी आढळल्या असून त्यांचे स्कॅनिंग व संकेतस्थळावर नोंदी अपलोड केले आहे. आत्तापर्यंत ३१ हजार ६२२ जणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून त्यापैकी ३० हजार ८०० जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. या प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदी बाबत व जात पडताळणी प्रक्रियेबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जात पडताळणी समिती सदस्य भारत केंद्रे, सदस्य सचिव संभाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी आलेल्या तक्रारीनुसार जात पडताळणी कार्यालयात अनियमितता निदर्शनास आली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारे चुकीची बाब आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल. तसेच तक्रारदाराच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी महसूलने वेगवेगळ्या १४ विभागांच्या सहाय्याने शोधलेल्या नोंदी व त्यावरील कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. जून अखेर ९ हजार २३७ जणांना जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने प्रमाणपत्र दिले आहे.

संजय गांधी योजना लाभार्थ्यांना मदत करा

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासकीय कार्यालये व बँकांमध्ये विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ई-केवायसी आणि आधार पडताळणीसंदर्भात पंधरवडाभराचे विशेष अभियान राबवा, यात गरजूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवा, योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करा.

Web Title: Distribution of over 30000 Kunbi certificates in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.