Kolhapur Politics: मुश्रीफ-कोरे, दोघांत मतभेदाचे वारे; ‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य
By राजाराम लोंढे | Updated: March 11, 2026 12:41 IST2026-03-11T12:41:04+5:302026-03-11T12:41:42+5:30
गडहिंग्लजमध्ये पडली वादाची ठिणगी : शह-काटशहाचे राजकारण उफाळले

Kolhapur Politics: मुश्रीफ-कोरे, दोघांत मतभेदाचे वारे; ‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य
राजाराम लोंढे
कोल्हापूर : गेल्या तीन दशकापासून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय काेेरे यांच्यामधील दोस्ताना जिल्ह्याने अनुभवला. पण, सध्या या दोन जिवलग दोस्तांमध्ये मतभेदाची दरी रुंदावली आहे. गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत पडलेल्या ठिणगीचा जिल्हा परिषद निवडणुकीत भडका उडाला आणि बघता-बघता दोघांमध्ये शह-काटशहाचे राजकारण उफाळून आले आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांनी संघटनकौशल्याच्या बळावर आपापली ताकद निर्माण केली. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गोकुळ, कोल्हापूर बाजार समिती, शेतकरी संघामध्ये मंत्री मुश्रीफ व आमदार कोरे यांनी हातात हात घालून काम करत आपलेच वर्चस्व कायम राखले. पण, नगरपालिका निवडणुकीत कोरे यांनी गडहिंग्लजमध्ये लक्ष घातले.
वाचा : ‘त्या’ दूध संस्थांना वगळून निवडणूक घ्या, दुग्ध विभागाकडे बेलवाडे यांची मागणी
मुश्रीफ यांच्या पारंपरिक विरोधक स्वाती कोरे यांना सोबत घेत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले. येथूनच दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. त्या रागातून मुश्रीफ यांनी पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यांत ताकद लावली आणि पन्हाळा, शाहूवाडीत काेरे यांना फटका बसला. दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले असून, भाजपने आमदार कोरे यांना पुढे करून मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भटकता आत्मा..
जिल्हा परिषदेत मुश्रीफ यांचा सत्तेचा दावा मोडून काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरे यांना हाताशी धरले आहे. जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीरे असली तरी आत्मा एकच आहे, असे विधान मंत्री पाटील यांनी केले होते. मग तसे असेल तर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत हा आत्मा कुठे भटकायला गेला होता, अशी खोटक टीका मुश्रीफ यांनी केली आहे. महापालिकेला जनसुराज्यच्या उमेदवारांचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे.
अलिखित करार...
मंत्री हसन मुश्रीफ व आमदार कोरे यांच्या मध्ये काहीसा अलिखित करार झाला होता. एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करायची नाही. त्यानुसार मुश्रीफ यांनी कधीही पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत लक्ष घातले नाही. या मैत्रीतूनच जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचे राजकीय नुकसान झाले. दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची एकवाक्यता होती.
मुश्रीफ-सतेज यांच्या मैत्रीवर आक्षेप
मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये अंतर्गत समझोता असून, कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचा आक्षेप भाजपच्या नेत्यांचा आहे. पण, जिल्हा परिषद निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘हातकणंगले’, ‘शिरोळ’, ‘गडहिंग्लज’मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढली आहे.
‘गोकुळ’च्या राजकारणावर परिणाम शक्य
मुश्रीफ-कोरे यांच्यात ताणलेल्या संबंधाचे परिणाम आगामी राजकारणावर उमटणार हे निश्चित आहे. ‘गोकुळ’मध्ये गेली अनेक वर्षे एकत्र असणारे हे दोन्ही नेते आता काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.