जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंची निवड, कोल्हापुरातील उद्धवसेनेत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:45 IST2025-06-28T15:45:18+5:302025-06-28T15:45:50+5:30
ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंची निवड, कोल्हापुरातील उद्धवसेनेत नाराजी
कोल्हापूर : उद्धवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांची शुक्रवारी नियुक्ती झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने संपर्क नेते, माजी खासदार विनायक राऊत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी ही नियुक्ती केली. इंगवले यांच्या निवडीनंतर ठाकरे गटामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पक्षाचे उपनेते म्हणून जबाबदारी दिल्यानंतर पक्षाने नवीन जिल्हाप्रमुखांचा शोध सुरू केला होता. या पदासाठी इंगवले यांच्यासह पक्षाचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे, विराज पाटील, राजू यादव इच्छुक होते. पक्षाने इंगवले यांच्यावर जबाबदारी सोपवली.
संजय पवार नाराज
इंगवले यांची निवड झाल्यानंतर उद्धवसेनेत नाराजीची मशाल धुमसू लागली. रविकिरण इंगवले आणि शिवसेना ठाकरे गटातील उपनेते संजय पवार यांच्यात पहिल्यापासूनच वाद असल्याने पवार नाराज झाले. त्यामुळे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील नाराजी ठाकरे गटाला आणखी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
पक्षात काहीसी मरगळ आली होती, ती झटकून सामान्य माणसांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरू. मतदारांची घुसखोरी झाली नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी, महायुतीचा सुपडासाफ करेल. - रविकिरण इंगवले (जिल्हाप्रमुख, उद्धवसेना)