राज्यभरात पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 06:31 PM2019-08-13T18:31:23+5:302019-08-13T18:33:44+5:30

पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांचे ताप, अतिसार आणि कावीळ या आजारनिहाय सर्व्हेक्षण देखील केले जात आहे. दरम्यान, राज्यभरात सध्या 570 वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे 196 तर सांगली येथे 144 पथके कार्यरत आहेत.

Disease-based survey of citizens in flood affected areas | राज्यभरात पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण

राज्यभरात पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देपूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षणरक्तदाब, मधुमेहावरील जीवरक्षक औषधांचे मोफत वाटप

कोल्हापूर/ सांगली : पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहिर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याचे वाटप केले जात आहे. मदत छावण्यांमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांचे ताप, अतिसार आणि कावीळ या आजारनिहाय सर्व्हेक्षण देखील केले जात आहे. दरम्यान, राज्यभरात सध्या 570 वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे 196 तर सांगली येथे 144 पथके कार्यरत आहेत.

मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तेथे ठेवलेल्या नोंदवहीत आजारनिहाय माहिती ठेवली जाते. दररोज सायंकाळी त्याचा एकत्रित डेटा तयार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्थलांतर करताना अनेक जण केवळ अंगावरील कपड्यावरच घराबाहेर पडले. ज्यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारासंबंधी औषधोपचार सूरू होता त्यांना दररोज गोळी घेता यावी, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन नये यासाठी, मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत का याची विचारणा आरोग्य कर्मचारी करीत आहेत. त्यांना सात दिवस पुरतील अशा गोळ्या देखील मोफत वाटप करण्यात येत आहेत. शासकीय दवाखान्यात या गोळ्या उपलब्ध नसतील तर खासगी दुकानातून विकत घेऊन त्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सागितले.

काही भागात मदत छावण्यांमधून नागरीक घराकडे परतत आहेत. त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळीचा वापर कसा करावा याची देखील माहिती दिली जात आहे. गर्भवती महिलेस पाणी उकळून देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

आरोग्य अभियानातून फवारणी औषध, पावडर खरेदीस मान्यता

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस दहा हजार रूपये आरोग्यावरील खर्चासाठी दिले जातात. पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींनी या दहा हजार रुपयांमधून आता फवारणीसाठी औषध, जंतूनाशक पावडर खरेदी करावी तसेच धूर फवारणी यंत्राची दुरुस्ती देखील या निधीतून करण्यास मान्यता देण्यात आल्याचे, डॉ. व्यास यांनी सांगितले.

आठवडाभरापासून आरोग्यमंत्री पुरग्रस्तभागातच

दरम्यान, गेला आठवडाभर आरोग्यमंत्री या भागात तळ ठोकून असून पूरग्रस्तांना मदतीचे वाटप कार्यात सक्रीय सहभाग घेत आहेत. वैद्यकीय पथक आणि औषधोपचाराचे वाटप याचे समन्वय करीत आहेत. सांगली, कोल्हापूर या भागातील मदत छावणीला आरोग्यमंत्र्यांनी भेट देताहेत. नागरिकांची विचारपूस करतानाच आरोग्य सुविधा देखील उपलब्ध करून देत आहेत.

मुंबई येथून गेलेले सुमारे 100 डॉक्टरांच्या पथकामार्फत देखील नागरिकांची तपासणी केली जात आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांचे समन्वयन केले जात आहे. पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एन.डी.आर.एफ. तसेच भारतीय सैन्यातील जवानांची आरोग्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी वैद्यकीय आरोग्य शिबिरात जवानांची तपासणी करण्यात आली.

Web Title: Disease-based survey of citizens in flood affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.