डिजिटल अरेस्ट : प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:22 IST2025-05-29T10:22:19+5:302025-05-29T10:22:41+5:30

‘ट्राय’चे अधिकारी अन् मुंबई पोलिस असल्याची बतावणी

Digital arrest Kolhapur Professor cheated of Rs 3 crore 50 lakh | डिजिटल अरेस्ट : प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा

डिजिटल अरेस्ट : प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा

कोल्हापूर : आर्थिक फसवणूकीत सहभाग असल्याने डिजिटल आणि प्रत्यक्ष अटक करून बदनामी करू, अशी भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (७५, रा. सम्राटनगर, सरनाईक माळ, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाख २३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार १८ एप्रिल ते २७ मे २०२५ दरम्यान घडला. 

डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजारामपुरी पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले की, सम्राटनगर येथील मीना डोंगरे आणि त्यांचे पती मुरलीधर हे दोघे अंध व्यक्तींसाठी स्वयंसेवी संस्था चालवितात.
 
दोघेही सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. मीना यांच्या मोबाइलवर १८ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास व्हॉट्सॲप कॉल आला. ट्रायचे (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी डोंगरे यांच्याविरोधात २ जानेवारी २०२५ रोजी माहीम येथील कुलाबा पोलिस ठाण्यात नरेश गोयल मनी लाँड्रिंग अँड इन्व्हेस्टमेंट फ्रॉड केसमध्ये गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. 

डोंगरे यांना काय सांगण्यात आले? 

डोंगरे यांना सांगण्यात आले की, त्यांच्या आधार कार्डचा वापर करून माहीम येथे एका बँकेच्या शाखेत मनी लाँड्रिंगचे सहा कोटी रुपये जमा झाले असून, याबाबत डिजिटल अरेस्ट करून कायदेशीर कारवाई करणार आहोत. यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे द्यावे लागतील; अन्यथा, प्रत्यक्षात घरी पोलिस पाठवून अटक करू, असे सायबर भामट्यांनी धमकावताच त्या पैसे देण्यास तयार झाल्या. 

१५ वेळा ठेवी मोडल्या  

सायबर भामटे ४० दिवस डोंगरे यांच्या संपर्कात होते. परराज्यातील विविध पाच बँक खात्यांवर त्यांनी आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे १५ वेळा ऑनलाइन रक्कम उकळली. पैसे देण्यासाठी डोंगरे यांनी ठेवीही मोडल्या.

मुलीमुळे प्रकार उघडकीस

काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या मीना डोंगरे यांची डॉक्टर मुलीने विचारपूस केली. त्यानंतर मीना यांनी घडलेला प्रकार सांगितला. सायबर भामट्यांकडून ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंगरे यांनी पोलिसांत धाव घेतली.
 

Web Title: Digital arrest Kolhapur Professor cheated of Rs 3 crore 50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.