Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना शीतपेयातून विषबाधा; ३५ जण रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:30 IST2026-03-16T12:30:30+5:302026-03-16T12:30:54+5:30

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात अशी भाविकांतून मागणी

Devotees poisoned by cold drinks during Balumama Bhandara festival in Adampur Kolhapur, 35 hospitalized | Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना शीतपेयातून विषबाधा; ३५ जण रुग्णालयात

Kolhapur: आदमापूर येथे बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना शीतपेयातून विषबाधा; ३५ जण रुग्णालयात

गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवादरम्यान रविवारी रात्री भाविकांना अचानक विषबाधा झाल्याची घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी थंडपेयाचे सेवन केल्यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रकृती अस्वस्थ झालेल्या ३५ जणांना तातडीने मडिलगे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदमापूर येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दानशूर व्यक्तींमार्फत भाविकांना थंड पेयांचे वाटप केले जात होते. यावेळी काही भाविकांनी ते प्राशन केले. त्यानंतर काही वेळातच काहीजणांना मळमळ, उलट्या, पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

प्रकृती बिघडलेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य विभागाच्या पथकाने घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासन जरी ३५ रुग्णांची माहिती देत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या शेकड्यांत असल्याची भीती व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकांच्या सायरनमुळे गावातील लोकांना नेमके काय झाले, हे समजत नव्हते. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनही सतर्क झाले असून, डॉ. शेखर जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद वर्धन तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

याबाबत प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी सांगितले की, सुमारे ३५ लोकांना याची बाधा झाली आहे. तालुक्यातील मडिलगे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र, गारगोटी उपजिल्हा रुग्णालय तसेच वाघापूर उपकेंद्रात रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीची उपाययोजना म्हणून राधानगरी व कागल तालुक्यांतील आरोग्य विभागालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक काटेकोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

Web Title : कोल्हापुर: बालूमामा भंडारा उत्सव में फूड पॉइजनिंग, 35 अस्पताल में.

Web Summary : कोल्हापुर के आदमापुर में बालूमामा भंडारा उत्सव में ठंडा पेय पीने के बाद 35 भक्तों को फ़ूड पॉइज़निंग हुई। उल्टी और पेट दर्द की शिकायत के बाद अस्पताल में भर्ती कराया गया। अधिकारी जांच कर रहे हैं।

Web Title : Kolhapur: Food poisoning during Balumama Bhandara festival, 35 hospitalized.

Web Summary : 35 devotees were hospitalized due to suspected food poisoning after consuming cold drinks at Balumama Bhandara festival in Admapur, Kolhapur. Symptoms included vomiting and abdominal pain. Authorities are investigating.