समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:38 IST2023-07-05T13:37:48+5:302023-07-05T13:38:24+5:30
कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे नाराज

समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले..
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. ते कुठे तुमच्या आडवे आले तर त्यांना परतवण्याची ताकद आमच्याकडे आहे, असा विश्वास देतानाच सध्याची विधानसभेची तयारी चालूच ठेवा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना मंगळवारी स्पष्ट शब्दात सांगितले. या गटाच्या वतीने आज बुधवारी त्यासंदर्भातील भूमिका प्रेसनोट काढून स्पष्ट केली जाणार आहे.
कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे रविवारपासून नाराज झाले होते. ते पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती. परंतू या सर्व शक्यतांना त्यांनीच पूर्णविराम दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या मंत्रालयातील कक्षात सुमारे पाऊण तास चर्चा झाली.
यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष बाळ घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहूचे संचालक युवराज पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, सुनील मगदूम आदी उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यांनीही कोणताही वेगळा विचार करू नका, असे सांगितले.
मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात सहभाग आहे, त्यांनी काय भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आताही कागलच्या राजकारणात मुश्रीफ, संजय घाटगे गट विरोधात आहेत. खासदार संजय मंडलिक गट सोबत असला तरी त्यांच्यावर कोणताच भरवसा नाही. अशा स्थितीत तिन्ही गट अंगावर घेऊन राजकारण करताना भाजपची ताकद महत्त्वाची आहे. विधानसभेवेळी महाराष्ट्राचे चित्र नक्की कसे राहते याचा आज काहीच अंदाज नाही. त्यावेळी ज्या त्या पक्षाने निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळू शकते.
आता सहा वर्षे भाजपमध्ये चांगले स्थान निर्माण केले असताना वेगळा विचार करू नये, असाही मतप्रवाह गटाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला. त्याचीही चर्चा या बैठकीच्या केंद्रस्थानी राहिली. मी यापूर्वीही तुमचे कोणते पत्र आले आणि ते प्रलंबित ठेवलंय, असा अनुभव नाही. यापुढेही तसे घडणार नाही. जी काही ताकद द्यावी लागेल ती देण्यासाठी सक्षम असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी निक्षून सांगितले.
काँग्रेस, ठाकरे गटाकडून संपर्क
घाटगे नाराज असल्याचे समजताच काँग्रेससह शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. कागल विधानसभेसह लोकसभा उमेदवारीसाठीही चाचपणी केल्याचे समजते. परंतु घाटगे यांनी त्यास तूर्त कोणताच प्रतिसाद दिला नाही.