महिन्यात शहर प्लाास्टिकमुक्त, सेवाभावी संस्थांच्या बैठकीत निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:57 IST2020-02-19T16:54:58+5:302020-02-19T16:57:29+5:30
पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी बुधवारी महापालिकेत आयोजित केलेल्या विविध सेवाभावी संस्थांच्या बैठकीत महापौर निलोफर आजरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक अशोक जाधव, आदी उपस्थित होते.
कोेल्हापूर : पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने यापूर्वीपासूनच पावले टाकण्यात आली आहेत, प्लास्टिकविरोधी जागृती होत आहे. येत्या २२ फेब्रुवारीला जनजागृतीपर पदयात्रा काढण्याचा तसेच महिन्यात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
शहर प्लास्टिकमुक्तीसाठी सर्व असोसिएशन व सेवाभावी संस्थांची संयुक्त बैठक बुधवारी महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी प्लास्टिकबंदी कृती आराखडा जनजागृतीची माहिती दिली. महास्वच्छता मोहिमेप्रमाणे प्लास्टिक बंदीबाबत लोकचळवळ उभी करूया. महिन्याभरात शहरात प्लास्टिकबंदी करू शकतो. पर्यावरण रक्षणासाठी शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी)ला शहरामध्ये जनजागृतीपर पदयात्रा काढू. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी चित्रफितीद्वारे प्लास्टिकबंदीबाबत सादरीकरण केले.
यावेळी प्रदीपभाई कापडिया, अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले, अशोक पोवार, डॉ. भोपाळ गावडे, अमित देशपांडे, महंमद शरीफ शेख, अजय कोराणे, रमेश मोरे यांनी आपल्या सूचना मांडल्या.
यावेळी खाटीक समाजाचे शिवाजी घोटणे, फिश मार्केटचे शौकीन घोटणे, सहारा फौंडेशनचे राज कोरगांवकर, स्वच्छतादूत अमित देशपांडे, फूलव्यापारी विश्वास जगदाळे, एकटी संस्थेच्या सदस्या सविता कांबळे, रोटरी क्लबचे डॉ. आनंद गुरव, हॉटेल असोसिएशनचे अभय बागलकर, जनरल मटण मार्केटचे प्रकाश प्रभावळकर, नार्वेकर भाजी मार्केटच्या अध्यक्ष गुणवंता पाटील, ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईचे अध्यक्ष राजेंद्र लयकर, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, महिलाध्यक्ष सविता पाडळकर, हॉटेल मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, अरुण चोपदार, आदी उपस्थित होते.