Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:49 IST2025-04-23T13:47:45+5:302025-04-23T13:49:31+5:30

ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणार

Despite the terrorist attack in Pahalgam in the Kashmir Valley all tourists in Kolhapur district are safe | Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

कोल्हापूर : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे अतिरेक्यांचा हल्ला झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर आणि बेळगावचे सुमारे २०० पर्यटक सध्या या परिसरात पर्यटनासाठी गेले आहेत.

संध्याकाळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याची बातमी दूरचित्रवाणीवर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या छातीत धस्स झाले. प्रत्येक घरातून सातत्याने त्यांना फोन सुरू झाले. परंतु त्याठिकाणी केवळ पोस्टपेड सेवा सुरू असल्याने अनेकांचे फोन लागू शकले नाहीत. परिणामी, अनेकांच्या नातेवाइकांच्या घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. 

सहल संयोजक रवी सरदार यांनी फोन करून ‘लोकमत’ला सांगितले की, बहुतांशी पर्यटक या पहलगामहून सुरक्षितपणे श्रीनगरला पोहोचले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत. अनेकांचे फोन लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. परंतु सर्वजण सुरक्षित असून, त्यांची काळजी न करण्याचे आवाहन सरदार यांनी केले आहे.

अनेकांचे नियोजन रद्द

या घटनेमुळे कोल्हापूर आणि परिसरातून काश्मीरला जाणाऱ्या अनेकांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. इतका भीषण दहशतवादी हल्ला झाल्याने ज्यांनी खरोखरच जाण्यासाठी आरक्षण केले आहे. त्यांनीही फेरविचार करायला सुरुवात केली आहे. या सर्वप्रकरणी केंद्र शासन नेमका काय निर्णय घेणार आहे, याचीही प्रतीक्षा असल्याचे सहलीवर जाण्यासाठी आरक्षण केलेल्या नागरिकांनी सांगितले.

ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणार

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी पावसामुळे अडकलेले कोल्हापूरचे १६ पर्यटक सुरक्षित असून, ते उद्या, गुरुवारी कोल्हापुरात परत येतील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेले असून, रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. तसेच विमानाचे दरही वाढले आहेत. हे पर्यटक आज, बुधवारी विमानाने गोव्यात येतील व कारने गुरुवारी कोल्हापुरात येतील असे सांगितले.

Web Title: Despite the terrorist attack in Pahalgam in the Kashmir Valley all tourists in Kolhapur district are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.