कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही प्रशासनाकडून प्रस्ताव नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:21 IST2025-07-02T16:21:13+5:302025-07-02T16:21:33+5:30
मनपा-जि.प.मध्ये ताळमेळ नाही

कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही प्रशासनाकडून प्रस्ताव नाहीच
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या अनुषंगाने लगतच्या आठ गावचा नवीन प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी तसा प्रस्ताव तत्काळ राज्य सरकारला पाठवावा म्हणून पत्र दिले, तरीही गेल्या दहा- बारा दिवसांत महानगरपालिका असो की जिल्हा परिषद प्रशासन असो त्यांच्याकडून काहीच हालचाली सुरू नसल्याचे समोर येत आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ केली जावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती, तसेच हद्दवाढ होणे का आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून दिले होते. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या दोन्ही प्रधान सचिवांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, तसेच राज्य निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशा सूचना दिल्या होत्या.
महापालिका प्रशासकांना तसे पत्र देण्याचीही सूचनाही आमदार क्षीरसागर यांना केली होती. त्यानुसार क्षीरसागर यांनी दि. २२ जूनला प्रशासकांना आठ गावांचा उल्लेख करून नवीन प्रस्ताव पाठवावा, अशी पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्रावर अद्याप महापालिका व जिल्हा परिषद यांच्याकडून कसलीच कार्यवाही पूर्ण झालेली नाही. महापालिका नगररचना कार्यालयातील अधिकारी सांगतात की, आम्ही जिल्हा परिषदेला पत्र पाठवून त्यांचा अहवाल मागितलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी असे काेणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत आहेत.
जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचयतींचा जो काही अहवाल येईल, त्यास जोडून महापालिका आपला प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने प्रस्तावात समाविष्ट करायची माहिती संकलित केली आहे. जिल्हा परिषदेचा अहवाल आल्यानंतर ही सर्व माहिती प्रस्तावाच्या स्वरूपात राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्रानुसार महापालिकेने हद्दवाढीविषयी जिल्हा परिषदेकडे अहवाल मागितलेला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार आहोत. - एन. एस. पाटील, उपशहर रचनाकार
महापालिकेकडून आमच्यापर्यंत पत्र आलेले नाही, पत्र आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. - अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद