Kolhapur: उरूसावर बंदी, तरीही विशाळगडावर गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:47 IST2025-06-09T16:47:34+5:302025-06-09T16:47:48+5:30

तपासणी पथकाद्वारे प्रत्येकाला नंबरचा बिल्ला देऊन गडावर सोडले

Despite the ban on the Urs at Vishalgad, which is held after Bakri Eid, there is a crowd of devotees | Kolhapur: उरूसावर बंदी, तरीही विशाळगडावर गर्दी

Kolhapur: उरूसावर बंदी, तरीही विशाळगडावर गर्दी

आंबा : बकरी ईदनंतर होणाऱ्या विशाळगडावरील उरूसास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असली, तरी रविवारी गडावर सुमारे तीन हजारांवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्गा, भगवा चौक, मुंडा दरवाजा, चांद इमारत भागात भाविकांनी गर्दी केली होती. काही भाविकांनी कोंबड्यांची कुर्बानी दिली. देवदर्शनापेक्षा पोलिसी तपासणीच्या रांगा मोठ्या होत्या. बसमधील प्रवासी तपासणीस स्वतंत्र पथक कार्यरत होते.

गडापासून पाठीमागे आठ किलोमीटर वरील केंबुर्णेवाडी येथे पोलिसांनी पहिले तपासणी पथक उभारून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व भाविकांची कसून चौकशी करून गडाकडे सोडले जात होते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत देवदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. चार वाजताच गडावरील खोल्यातून व गडपरिसरातून तपासणी पथकाने भाविकांना बाहेर काढण्याची जणू मोहीमच राबवली. सहानंतर गडावर सामसूम पसरली.

काल ईदनिमित्त बंदोबस्तात असलेली पोलिस कुमक ठिकठिकाणी पहारा देत होती. न्यायालयाच्या अटी व शर्तीशी बांधील राहून देवदर्शन झाले. नमाज पठण पार पडले. तुरबतीवर फुलांच्या चादरी अर्पण करण्यात आल्या.

न्यायालयाच्या निर्देशानुसार रणमंडळ टेकडी समोरील मुबारक मुजावर यांच्या खासगी जागेत पत्राचे बंदिस्त शेड उभारून कोंबडीच्या कुर्बाणीस मुभा दिली गेली. येथे स्वच्छतेची मोठी दक्षता घेतली होती. पोलिस व आरोग्य पथकेही सज्ज होते. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक विजय घेरडे, प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे लक्ष ठेवून होते.

दोन टप्प्यांत कसून चौकशी

देवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविकांचे आधार कार्ड, मोबाइल नंबर, गाडी नंबर व चालकाचा गाडीसह फोटो काढणारी यंत्रणा केंबुर्णेवाडी येथे सज्ज होती. शिवाय गडावर चढताना पायथ्याला दुसऱ्या तपासणी पथकाद्वारे प्रत्येकाला नंबरचा बिल्ला देऊन गडावर सोडले जात होते. 

हामालांचे हात मोकळेच..

गडावर चढून जाण्यास चढणीचा मार्ग असल्याने भाविकांचा बोझा नेण्यास गजापूर, भाततळी भागातील हमाल स्त्री-पुरुष पायथ्याला सज्ज होते, पण बहुतेक भाविक मोकळेच आल्याने हमालांना रोजगार मिळाला नाही. महिला हमाल हात हालवित घरी परतल्या.

Web Title: Despite the ban on the Urs at Vishalgad, which is held after Bakri Eid, there is a crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.