कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:40 IST2025-09-24T12:40:18+5:302025-09-24T12:40:41+5:30
एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभेला जिल्ह्यात तळ ठोकला होता

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा
कोल्हापूर : एक खासदार, एक पालकमंत्री, दोन आमदार आणि एक पाठिंबा दिलेले आमदार यांच्या पाठबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सज्ज झाले आहेत. त्यामुळेच ८ ऑक्टोबरला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून शिंदे स्वत: या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
महायुती म्हणून तीन पक्ष कार्यरत असताना जोपर्यंत चिन्हावरचे किंवा आपल्याला मानणारे जादा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक निवडून येत नाहीत तोपर्यंत ताकद निर्माण होत नाही याची पक्की जाणीव शिंदे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा, विधानसभेला कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. अडचणीतील आपल्या उमेदवाराला हात देण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला होता. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निवडणुकाच महत्वाच्या असून त्या माध्यमातूनच कार्यकर्त्यांना पदे देता येत असल्याने त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक गांभीर्याने घेतल्या आहेत.
कोल्हापुरात शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे. राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे आबिटकर यांच्याकडे शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील निवडणुकांची जबाबदारी असून क्षीरसागर यांच्यावर प्रामुख्याने कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे. या दोघांनीही जोडण्या लावत अनेक मान्यवरांना शिंदेसेनेत आणले आहे. खासदार धैर्यशील माने यांच्यावर इचलकरंजी महापालिका आणि त्यांच्या मतदारसंघातील नगरपालिका, नगरपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार, आमदारांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केल्याचेही सांगण्यात येत आहे.
येणाऱ्या तीन महिन्यात जिल्हा परिषद, बारा पंचायत समित्या, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका आणि दहाहून अधिक नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावण्यासाठी शिंदेसेनेने कंबर कसली असल्याचे दिसून येते.