शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजप अस्वस्थ, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:14 IST2024-10-08T13:12:33+5:302024-10-08T13:14:31+5:30
रणनीतीकडे कार्यकर्त्यांचा नजरा

शरद पवार यांच्या दौऱ्याने भाजप अस्वस्थ, देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक आज मंगळवारी दुपारी ४ वाजता मुंबईत बोलावली आहे. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवून देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळेच ही बैठक होत असून, यामध्ये होणाऱ्या विचारमंथनाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतशरद पवार यांनी दौरे करत महायुतीमधून संधी न मिळणाऱ्यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक वैर विसरून पवार यांनी लोकसभेप्रमाणेच गाठीभेटींचे सत्र सुरूच ठेवल्याने सत्तारूढांच्या पोटात गोळा आला आहे. गेल्या विधानसभेला सोलापूर जिल्ह्याने भाजपला चांगला हात दिला होता. परंतु, यंदा तेथील परिस्थिती बदलली आहे. या सगळ्यामुळे भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.
समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, चंदगडचे शिवाजी पाटील हे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले गेले. त्यांच्या राजकारणाला फडणवीस यांनी सातत्याने सत्तेचे बळ दिले. परंतु, तरीही फडणवीस यांनी दिलेली ऑफर डावलून समरजित यांच्यापाठोपाठ हर्षवर्धन पाटीलही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेले आहेत. रामराजे निंबाळकर यांच्याही तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाजी पाटील यांच्याशीही राष्ट्रवादीने संपर्क साधला आहे.
आपण मैदानात उतरण्यासाठी तयार केलेली माणसे अशी हातातून सुटत असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. भाजपची सत्ता असताना २०१९ च्या अगोदर दोन्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्यासाठी अशीच रीघ लागली होती. या दोन पक्षांत कोण राहतंय की नाही अशी हवा तेव्हा तयार झाली होती.
अशातच कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. कोल्हापुरात तर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपच्या वाट्याला असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर हक्क सांगून वातावरण तापवले आहे. या पार्श्वभूमीवर या पाच जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रदेश सदस्यांची ही ‘सागर’ बंगल्यावर बैठक होत आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यात येणार असून, भाजपसोबतच युतीच्या उमेदवारांबाबतही चर्चा होणार आहे.