टंचाईच्या भीतीने कोल्हापुरात गॅस सिलिंडरच्या मागणीत तीन हजाराने वाढ; साठा, वितरणाबाबत प्रशासनाने दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:48 IST2026-03-16T12:47:14+5:302026-03-16T12:48:26+5:30
जिल्ह्यात एकूण ११२ गॅस एजन्सी असून ११.५ लाख घरगुती गॅस जोडण्या

संग्रहित छाया
कोल्हापूर : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. सरासरी २७ हजार सिलिंडरची मागणी असते; मात्र सध्या ती तीन हजाराने वाढून सुमारे ३० हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ओटीपीद्वारेच गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.
युद्धामुळे भविष्यात गॅस टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणावर आगाऊ बुकिंग करत असल्याने वितरण केंद्रांवर गर्दी होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून अनावश्यक बुकिंग करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ओटीपीद्वारेच गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण करण्याचे आदेश दिले असतानाही काही गॅस एजन्सीकडून कार्यालयातूनच सिलिंडरचे वितरण सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तसेच मागील आठवडाभर गॅस वाहतूक करणारी वाहने कमी प्रमाणात दिसत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील वितरण प्रणालीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने गॅस एजन्सींशी समन्वय ठेवून पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण ११२ गॅस एजन्सी असून ११.५ लाख घरगुती गॅस जोडण्या आहेत. तसेच ११ हजारांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. दरम्यान, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि अनाथालये यांसारख्या अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांचा व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे, असेही सांगण्यात आले.
कंपन्यांकडे पुरेसा स्टॉक
सध्या तीन कंपन्यांच्या ११२ एजन्सीकडे मिळून ७०,२६१ इतका सिलिंडरचा साठा आहे. शनिवारपर्यंत ३५,९५७ इतके सिलिंडर प्राप्त झाले होते, त्यापैकी २९,९२० सिलिंडर आतापर्यंत वितरित झाले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना सरासरी २६,९५० इतका साठा लागतो.