कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ४१० कोटींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:07 IST2026-02-12T12:07:35+5:302026-02-12T12:07:55+5:30
एक हजार कोटींच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ४१० कोटींची मागणी
कोल्हापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते विकास अशा सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय नियाेजन समितीच्या बैठकीत अतिरिक्त ४१० कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. शासनाकडून मान्यता आलेले ५३७.२० काेटी, अतिरिक्त ४१० कोटी, विशेष घटक योजनांसाठी १४३.८४ कोटी अशा १ हजार ०९३ काेटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याचे सादरीकरण केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, नियोजन उपायुक्त संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंजूर निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करा, ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव द्यावेत, मंदिर विकास आराखडे, शाहू स्मारक व केएमटी बसेससाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले. यावेळी अंबाबाई व जोतिबा विकास आराखड्यांचे सादरीकरण झाले.
आतापर्यंत ४० टक्के खर्च
सलग निवडणुका, आचारसंहितेमुळे चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीचा ७६४.६२ कोटींपैकी आतापर्यंत फक्त ३०७.५७ कोटींचा ४० टक्के निधी खर्च झाला आहे. पुढील दीड महिन्यात ४५७ काेटींचा निधी खर्च करावा लागणार आहे. यातील ९७ टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे निधी परत जाणार नाही, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
आर्थिक वर्षातील महत्त्वाची कामे व निधी
- जिल्हा परिषदेच्या २१३ शाळा समृद्ध करण्यासाठी ६४ कोटी
- जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ११.७९ कोटींचा निधी, पुढील वर्षी ४० आरोग्य केंद्रांसाठी १६ कोटी
- मिशन विद्या किरण या ४०६ शाळामंधील सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४.५७ कोटी, पुढील वर्षी ३९८ शाळांना ५ कोटी
- १५९ शासकीय कार्यालयांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी ६.३७ कोटी
- शाहू स्मारक भवन नूतनीकरणासाठी ६.३७ कोटी
- छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथील जलतरण तलाव नूतनीकरणासाठी ८१.११ लाख
- किल्ले भुदरगड येथे पर्यटन सुविधा १.२० कोटी-वन पर्यटन सुविधांसाठी १७.४९ कोटी
- शिंगणापूर येथील शाहू छत्रपती क्रीडा प्रशालेसाठी ३.९५ कोटी
- विभागीय क्रीडा संकुल संरक्षक भिंतीसाठी २ कोटी