फडणवीस यांच्याकडून शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 13:03 IST2020-05-07T12:57:37+5:302020-05-07T13:03:47+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली.

फडणवीस यांच्याकडून शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन
कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली.
बुधवारी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. यामध्ये शाहू महाराज यांचा उल्लेख थोर सामाजिक कार्यकर्ते असा केला आहे. फडणवीस यांना खऱ्या अर्थाने शाहू महाराज कळले नाहीत. शाहू महाराज हे पुरोगामी चळवळीचे अर्ध्वयू होते. त्यामुळे प्रतिगामी शक्ती नेहमीच त्यांचा द्वेष करतच आल्या आहेत.
फडणवीस यांनी शाहू महाराज यांचा केलेला एकेरी उल्लेख हेसुद्धा त्याचेच द्योतक आहे. शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समतेचे व लोककल्याणकारी असे महान ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख कार्यकर्ते असा एकेरी होणे हा आम्हा जनतेचा अवमान आहे.
हा अवमान शाहूप्रेमी जनता कदापिही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ, आदिल फरास आदी उपस्थित होते.