खोल समुद्रातील समुद्री पक्षी पावसाळी हंगामाशिवाय किनाऱ्यावर, देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात विहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:58 IST2025-11-07T15:57:42+5:302025-11-07T15:58:13+5:30
महाराष्ट्रात १५ ते १६ समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती

खोल समुद्रातील समुद्री पक्षी पावसाळी हंगामाशिवाय किनाऱ्यावर, देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात विहार
कोल्हापूर : चक्रीवादळामुळे वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे खोल समुद्रात अधिवास करणारे पेलाजिक म्हणजे समुद्र पक्षी जुलैमध्ये दिसण्याची अपेक्षा असताना हंगाम नसतानाही देवगड-कुणकेश्वर किनारपट्टी भागात दिसत असल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हे दुर्मीळ समुद्री पक्षी सिंधुदुर्गच्या किनारी भागापर्यंत उडत आले आहेत.
समुद्री पक्षी हे खोल समुद्रातील अधिवासासाठी ओळखले जातात. ते सहसा जमिनीवर येत नाहीत. त्यामुळे तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीण वसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीपर्यंत वाहवत जातात. सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर अवेळी पावसाचे आगमन झाले आहे.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली येथील पण सध्या सिंधुदुर्गातील देवगड येथील रहिवाशी पक्षी निरीक्षक श्रीकृष्ण मगदूम यांनी देवगड आणि कुणकेश्वर किनारपट्टी भागातून फ्रिगेटबर्ड, विल्सन स्ट्रोम पेट्रेल, आर्टिक स्कुआ या दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली आहे. यापूर्वीही त्यांनी व्हिनचॅट या स्थलांतरित पक्ष्यांची नोंद केली होती.
महाराष्ट्रात १५ ते १६ समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती
- जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी ३.५ टक्के प्रजाती समुद्री पक्षी गटातील आहेत. भारतात सागरी परिक्षेत्रात समुद्री पक्ष्यांच्या साधारण ५० प्रजाती सापडतात, तर महाराष्ट्रात १५ ते १६ प्रजाती आढळतात.
- फ्रिगेटबर्ड पक्ष्याच्या नेमक्या प्रजातीची ओळख पटलेली नाही. लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच अंदाजे २ फूट लांबीचा असला तरी, तो या आकाराने लहान पक्षी आहे. हिंद आणि पॅसिफिक महासागरात तो आढळतो.
जे खुल्या समुद्रात राहतात त्या पक्ष्यांना पेलाजिक म्हणतात. पेट्रेल, स्कुआ, फ्रिगेटबर्ड असे दुर्मीळ पक्षी फक्त अंडी घालण्यासाठी किंवा नवीन पिढी वाढवण्यासाठी जमिनीवर विशेषत: दुर्गम बेटांवर येतात. लांब आणि अरुंद पंखांचा वापर करून उडतात, त्यामुळे त्यांना हवेत जास्त वेळ राहणे शक्य होते. -श्रीकृष्ण मगदूम, पक्षी निरीक्षक.