महाविद्यालयं सुरू होणार का?, मंत्री उदय सामंत म्हणाले परिस्थिती पाहून निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 19:00 IST2021-02-20T19:00:01+5:302021-02-20T19:00:23+5:30
uday samant on colleges opening decision: महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? यावर भाष्य करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

महाविद्यालयं सुरू होणार का?, मंत्री उदय सामंत म्हणाले परिस्थिती पाहून निर्णय घेणार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? यावर भाष्य करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. "वाढत्या कोरोनाचा परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर होऊ नये, याच दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत", असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (decision on colleges be taken based on covid situation)
राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत येत्या काळातील परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. त्यासोबतच राज्यात कोरोनाची दुसरी नाट येऊ नये यासाठी जे करावं लागेल ते सर्व राज्य सरकार करेल, असा दावाही उदय सामंत यांनी यावेळी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ नये यासाठीच राज्यात कोरोना वाढत आहे, अशा भाजपच्या टीकेलाही उदय सामंत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. "अधिवेशन होऊ नये म्हणून राज्यात कोरोना वाढतोय असं विधान करणाऱ्यांबाबत आता काय बोलायचं? मग गुजरात आणि मध्य प्रदेशातही अधिवेशन होऊ नये म्हणून कोरोना वाढतोय का?", असा खोचक सवाल उदय सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.
महाविद्यालयात स्वराज्य रक्षक दिन साजरा करणार
ज्या राजाने आपल्या कारभाराने देशाला दिशा दिली त्या राजाचे कर्तृत्व नव्या पिढीसमोर जावे यासाठी महाविद्यालय पातळीवर स्वराज्य रक्षक दिन साजरा केला जाणार, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. यासाठीचं परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.