अंध सम्राटच्या जीवनात गरिबीचाही अंधार -बाळाला मदतीची गरज -औषधोपचार मिळाले तरच दिसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:28 IST2018-05-06T00:27:51+5:302018-05-06T00:28:28+5:30
कोल्हापूर : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, मोलमजुरी केली तरच पैसे; अन्यथा भिक्षा मागून खाणं हेच नशिबी. भाड्याच्या छोट्या खोलीत वास्तव्य.

अंध सम्राटच्या जीवनात गरिबीचाही अंधार -बाळाला मदतीची गरज -औषधोपचार मिळाले तरच दिसणार
भारत चव्हाण।
कोल्हापूर : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, मोलमजुरी केली तरच पैसे; अन्यथा भिक्षा मागून खाणं हेच नशिबी. भाड्याच्या छोट्या खोलीत वास्तव्य. सगळे जीवन अंधकारमय झालेलं, हे कमी की काय म्हणून पदरी एक अंध मुलगा. ज्याच्याकडे भविष्यकाळ म्हणून पाहावे, तोच अंध असल्यामुळे माणूस किती हतबल होतो याचा अनुभव पोळ कुटुंबीय घेत आहेत. या कुटुंबाच्या दुष्टचक्रात चार वर्षांच्या निरागस बालकाची मात्र ससेहोलपट होत आहे, ती केवळ उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे... आपल्या बाळासाठी मदत करणारा कोणीतरी देवदूत भेटेल ही भाबडी आशा घेऊन हे कुटुंब जगत आहे.
युवराज सीतामणी पोळ हा कधी वाढपी म्हणून काम करतो; तर कधी दुसऱ्याच्या रिक्षावर चालक म्हणून काम करतो. त्याची वयोवृद्ध आई मंगल ही रेणुकादेवीच्या नावानं जोगवा मागते. वडील सीतामणी यांच्या आजारपणात जवाहरनगरातील दोन खोल्यांचं राहतं घर विकावं लागलं. घर गेलं आणि वडीलही गेले. त्यामुळे युवराज, त्याची पत्नी मनीषा, आई मंगल उघड्यावर पडले. पाठीवर संसार, मिळेल तसे काम आणि मिळेल तिथं भाड्याच्या खोलीत राहण्याचा कटू प्रसंग ओढवला.
युवराजला चार वर्षांपूर्वी मुलगा झाला. त्याचं नाव सम्राट ठेवलं. जन्मल्यानंतर एक वर्षभर सगळं कसं नॉर्मल! सम्राटला नीट दिसत होतं; पण एके दिवशी त्यानं डोळे झाकलेत ते आजतागायत! त्याला अचानक दिसायचं बंद झालंय. सरकारी दवाखान्यात दाखविलं. तिथं ‘आपल्याकडे उपचार होणार नाहीत, खासगी रुग्णालयात दाखवा,’ असं सांगितलं गेलं. कुणीतरी सांगलीतील रुग्णालयाचा पत्ता दिला. तिथं मुलाला दिसेल; पण शस्त्रक्रिया करावी लागेल, असं सांगितलं गेलं; पण खर्चाचं गणित ऐकून कुटुंब हबकून गेलं. त्यांनी पुढे कोल्हापुरातच खासगी रुग्णालयात दाखविण्याचा प्रयत्न केला; पण पैशामुळे अडायला लागलं. गेल्या तीन वर्षांपासून या कुटुंबाची तगमग पाहवत नाही. कोणीतरी दाता भेटेल आणि आपल्या बाळाला मदत करील, ही आशा घेऊन हे कुटुंब जगत आहे; परंतु अद्याप त्यांच्या पदरी निराशाच आहे.
सातव्या महिन्यांतच जन्म
मनीषा गर्भवती राहिल्यानंतर सातव्या महिन्यांत पोटात कळा सुटल्या. तिला सरकारी रुग्णालयात नेले. दिवस भरण्यापूर्वीच तिची प्रसूती झाली. एक गोंडस बाळ... सम्राट जन्माला आला. वजन कमी असल्यामुळे तब्बल दोन महिने सम्राटला पेटीत ठेवण्यात आले. शरीराची वाढ कमकुवत असल्याने त्याच्यावर लहान वयातच बरेच औषधोपचार करण्यात आले. त्याच्या औषधपाण्यावरही बराच खर्च झाला. वर्षभर सम्राट सगळ्यांकडे कुतूहलाने पाहायचा; आणि एके दिवशी त्याने डोळे मिटले ते अद्यापही तसेच मिटलेले आहेत, असे मंगल सांगतात.
केवळ पैसे नसल्यामुळे...
जिथं खाण्यापिण्याचीच आबाळ आहे, तिथं औषधोपचारांसाठी पैसे कोठून येणार? कोणी ना ओळखीचं, ना पाळखीचं. कर्ज काढून उपचार करावेत म्हटलं तर जवळ काहीच नाही. अशा विचित्र अवस्थेत जगणाºया पोळ कुटुंबाने सम्राटचे भविष्य देवाच्या हवाली केलं आहे.
‘आंधळ्याच्या गाई परमेश्वर राखतो’ असं म्हटलं जातं आणि आता सम्राटला दृष्टी द्यायची की नाही, ते तोच काय ते बघून घेईल, असा हतबल असलेल्या मंगल यांचा आशावाद आहे...
जोगवा मागतच आजीकडून सांभाळ
युवराजची पत्नी मनीषा अंध सम्राटला, आजी मंगलच्या स्वाधीन करून माहेरी गेलीय. अधूनमधून ती चौकशी करते. मंगल या रेणुकादेवीच्या भक्त. तिच्या नावावर जोगवा मागतात. घरी कुणी नसल्यामुळे सायंकाळी त्या सम्राटला घेऊनच घराबाहेर पडतात. अंबाबाई मंदिराजवळ भिक्षा मागत बसतात. सम्राट त्यांच्या बाजूला बागडत असतो. शुक्रवारी तर तो चक्क गायीशेजारी बसून तिला स्पर्शाने न्याहाळत होता. सम्राटचा सांभाळ करताना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मंगल त्याच्यावर लक्ष ठेवतात.