कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:21 AM2019-05-25T11:21:28+5:302019-05-25T11:27:15+5:30

लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत.

The danger bells for both the Congress candidates | कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

कोल्हापूर  दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धोक्याची घंटा; विधानसभा निवडणुकीत वाढणार अडचणी

Next
ठळक मुद्देकोणत्याही शंका उपस्थित न करता लोकांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान केले आहेशहरांतही उजव्या विचारांचा प्रभाव असणारा मोठा वर्ग आहेशुक्रवारी दिवसभर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याबद्दलच चिंता व्यक्त झाली.

विश्र्वास पाटील : कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. या पक्षांच्यामागे गेलेला मतदार परत आणण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे; त्यामुळे शुक्रवारी दिवसभर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये याबद्दलच चिंता व्यक्त झाली.

 

कोल्हापुरात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे तब्बल दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी विजयी झाले. हातकणंगलेतून शिवसेनेचेच धैर्यशील माने हे ९६ हजार ३९ मतांनी विजयी झाले. मंडलिक विजयी होतील अशी हवा अगोदर तयार झाली होती. हातकणंगलेत मात्र माने की राजू शेट्टी हा संभ्रम होता. म्हणजे दोन्ही मतदारसंघात लढत अटीतटीची होती. कोणी निवडून आले तर मताधिक्य पाच-पंचवीस हजारांपेक्षा जास्त असणार नाही, असे उमेदवारांचे समर्थकच बोलून दाखवित होते; परंतु तरीही प्रत्यक्ष निकालात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांना एकाही फेरीत मताधिक्य तरी मिळाले नाही. मंडलिक यांचे मताधिक्य तर त्यांच्यासह सर्वांनाच अचंबित करणारे आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी कॅम्पेन राबविली; त्यामुळे त्यांचा विजय साकारला हे खरे असले, तरी ही मोहीम व महाडिक नकोत या जनभावनेचे हे एवढे लीड नाही. त्यामागे तरुण, प्रथम मतदार, सुशिक्षित, मध्यम व उच्च मध्यमवर्ग, व्यापारी उद्योजकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच मोदी यांच्याबद्दल वाटत असलेली क्रेझ हेच महत्त्वाचे कारण आहे. मोदी प्रश्न सोडवतील, यापेक्षा मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील ही धार्मिक खुमखुमी जास्त होती; त्यामुळे उमेदवार कोण आहेत, ते आपले प्रश्न सोडवतील का, त्यांचे राजकीय चारित्र्य कसे आहे, असल्या कोणत्याही शंका उपस्थित न करता लोकांनी या दोन्ही उमेदवारांना मतदान केले आहे; त्यामुळेच मताधिक्याचा काटा कीर्र झाला आहे. हाच खरा धोका आहे.

मंडलिक यांना कागल मतदारसंघात सर्वाधिक ७१४२७ चे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात प्रमुख तीन गट त्यांच्या बाजूने होते; त्यामुळे लीड अपेक्षितच होते. दक्षिण मतदारसंघातून मंडलिक यांना मिळालेले लीड एकट्या सतेज पाटील गटाचे नाही. त्यामध्ये भाजपला मानणाºया हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचाही त्यात वाटा आहे; कारण या मतदारसंघात शहरी भाग निम्मा आहे. हीच स्थिती चंदगड, राधानगरी, करवीर व उत्तर मतदार संघातील आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार असूनही जिथे शिवसेनेचे आमदार आहेत त्यापेक्षा कागल, चंदगड व दक्षिण मतदारसंघाने त्यांना जास्त लीड दिले आहे. शिवसेनेच्या आमदारांतही शहरातून लीड कमी मिळाले; कारण या मतदारसंघात महाडिक गटाला मानणारा वर्ग आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही धैर्यशील माने यांना तब्बल ७४९३० मतांची आघाडी मिळाली. या शहरांतही उजव्या विचारांचा प्रभाव असणारा मोठा वर्ग आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपचे सुरेश हाळवणकर हे दोनवेळा विजयी झाले आहेत. त्यांनी माने यांना दिलेले लीड काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांचे ठोके वाढविणारे आहे.

शुक्रवारी राजू शेट्टी यांना भेटायला आलेल्या काँग्रेस व त्यातही आवाडे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाही हीच चिंता सतावत होती. दोन्ही काँग्रेसची अभेद्य एकजूट, त्यास वंचित आघाडीसह इतर डाव्या, पुरोगामी पक्षांची मनांपासून मदत झाली तरच विधानसभेला या पक्षांच्या उमेदवारांचा निभाव लागणार आहे. त्याची मोर्चेबांधणी आतापासूनच करण्याची गरज आहे.

शाहूवाडीत २१७४३ चे लिड
गेल्या लोकसभा निवडणूकीत शेट्टी यांना शाहूवाडी मतदार संघातून ४२९०० मतांचे लिड मिळाले होते. या निवडणूकीत ते फेडून धैर्यशील माने यांनी धनुष्यबाण चिन्हांवर २१७४३ चे लिड मिळाले. आपल्याला धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागू नये यासाठी माजी आमदार विनय कोरे यांनी या निवडणूकीतून अंग काढून घेतले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांचे काम केल्याची चर्चा होती तरीही माने यांना चांगले मताधिक्य मिळाले असल्याने कोरे यांचीही धाकधूक वाढली आहे.
 

 

Web Title: The danger bells for both the Congress candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.