भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापुरात टपाल कार्यालयाबाहेर रांगा, काही ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:06 IST2025-08-06T16:05:41+5:302025-08-06T16:06:34+5:30
नव्या प्रणालीचा फटका

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : दूरगावी असणाऱ्या भाऊरायाला रक्षाबंधनासाठी आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी लाडक्या बहिणींची लगबग सुरू आहे. मंगळवारी शहरातील सर्वच टपाल कार्यालयांत लोकांची चांगलीच गर्दी झाली. रेल्वेस्टेशनसमोरील टपाल कार्यालयासह काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. पोस्ट खात्याने सर्वच पोस्ट कार्यालयांत नवीन प्रणाली लागू केल्याने अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणींसह ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येला तोंड द्यावे लागले.
राख्या पाठवण्याचे हक्काचे माध्यम म्हणून लाडक्या बहिणी दरवर्षी पोस्ट खात्याचा आधार घेते. रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील सज्ज झाला आहे. यानिमित्ताने वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विविध पोस्ट कार्यालयांत राखी पाठविण्यासाठीच्या स्पीड पोस्ट, तसेच ऑर्डिनरी बुकिंगसाठी स्वतंत्र आणि अतिरिक्त खिडक्या सुरू केल्या आहेत. शहरातील सर्वच पोस्ट कार्यालयांत रोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत आहे. येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने पोस्ट कार्यालयांत गर्दी होते आहे.
डाक विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या मंगळवारपासून कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाने ‘एपीटी (ॲडव्हान्स्ड प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर लागू केले. मात्र, अनेक कार्यालयांना ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्यामुळे वेळ वाढवून द्यावी लागली. शहरातील रेल्वेस्टेशनसह अन्य पोस्ट कार्यालयांनाही दिवसभर ही समस्या जाणवली. त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला, अनेक ठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या होत्या.