टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:15 IST2024-04-08T12:13:24+5:302024-04-08T12:15:54+5:30
'कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मी त्या शब्दांचा वापर केला होता'

टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार
उत्तूर : निवडणूक काेणतीही असो मी अत्यंत मनापासून लढतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक-एक मताची शिकस्त करून परगावचे मतदान आणावे यासाठी मी प्रेरणा देत असतो. मात्र, जयंत पाटील यांनी हेलिकॉप्टरच्या माझ्या ‘त्या’ वक्तव्यावर टीका करून स्वतः मात्र हेलिकॉप्टरनेच आले, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. उत्तूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘परमेश्वरसुद्धा मंडलिक यांचा पराभव करू शकत नाही’, असे मी म्हटले होते. कार्यकर्त्यांना ऊर्जा आणि बळ देण्यासाठी मी त्या शब्दांचा वापर केला होता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
याप्रसंगी वसंतराव धुरे, महादेवराव पाटील, संभाजीराव तांबेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती घोरपडे, दीपक देसाई, संभाजी तांबेकर, गंगाधर हराळे, विष्णुपंत केसरकर, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिरीष देसाई यांनी स्वागत केले. काशीनाथ तेली यांनी प्रास्ताविक केले. गणपती सांगले यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर सावंत यांनी आभार मानले.