Kolhapur Crime: आल्यावर नाही, टप्प्यात आणून कार्यक्रम; सुजल कांबळे याची रील्स त्याच्यावरच उलटली
By उद्धव गोडसे | Updated: June 14, 2024 18:56 IST2024-06-14T18:55:12+5:302024-06-14T18:56:19+5:30
झोपडपट्ट्यांमधील तरुणाई गुरफटली गुन्हेगारी विश्वात

Kolhapur Crime: आल्यावर नाही, टप्प्यात आणून कार्यक्रम; सुजल कांबळे याची रील्स त्याच्यावरच उलटली
उद्धव गोडसे
कोल्हापूर : ‘सुजल कांबळे पैलवान ३०७' या इन्स्टा अकाउंटवरून सुजल याने ‘टप्प्यात आल्यावर नाही, तर टप्प्यात आणून कार्यक्रम करू,’ असा इशारा रिल्सद्वारे विरोधी टोळीला दिला होता. ‘मात्र, गंभीर मारामारीच्या (३०७) कलमाद्वारे इशारा देणाऱ्या सुजलचा विरोधी टोळीने टप्प्यात आणून खून (३०२) केला. या घटनेतून गुन्हेगारी विश्वात गुरफटलेल्या अवघ्या विशीतील तरुणाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही रेकॉर्डवरील गुन्हेगार दहशत माजविण्यासाठी भरदिवसा रस्त्यात खून पाडत असल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.
हातावरचे पोट असलेल्या कुटुंबातील सुजल कांबळे हा अवघ्या विशीतील तरुण. त्याने पैलवान होऊन नाव कमवावे यासाठी वडिलांनी जिवाचा आटापिटा केला. पण, पोरानं पैलवानकीत नाही, तर गुन्हेगारीत नाव कमवायचा चंग बांधला होता. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता. मारामारी, दमदाटीचे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पण, त्या कारवाईचा व्हिडिओ इन्स्टावरून व्हायरल करीत त्याने आपण सराईत होत असल्याचे स्पष्ट केले. मित्रांचे टोळकेही त्याच्यासारखेच आहे.
गुन्हेगारी विश्वात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या या पोरांचे इन्स्टा अकाऊंट खूप काही सांगणारी आहेत. वयाच्या विशीतच तीन-चार गुन्हे दाखल असलेल्या टोळ्या शहरातील मोठ्या गुंडांच्या नावाचा आधार घेत वसुलीची दुकानदारी चालवीत आहेत. दहशतीसाठी अपहरण, मारामारी, वाहनांची तोडफोड करणे हे त्यांच्यासाठी रोजचे बनले आहे. अशा गुन्हेगारांवर वेळीच कठोर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोस्तीच्या शपथा
सुजलचा खून झाल्यानंतर सीपीआरच्या आवारात मित्रांनी हंबरडा फोडत दोस्तीच्या शपथा घेतल्या. संशयित हल्लेखोरांची नावे घेऊन त्यांना सोडणार नाही, असे काहीजण म्हणत होते. त्यामुळे टोळ्यांमधील वाद आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
रस्त्यात वाढदिवस; चिथावणीखोर रिल्स
सुजल याच्यासह त्याच्या मित्रांनी रस्त्यात वाढदिवस साजरे केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. काही घटना आणि गुन्ह्यांचे संदर्भ घेऊन तयार केलेल्या रिल्समधून विरोधी टोळीला डिवचले आहे. चिथावणी देणाऱ्या रिल्समुळे टोळ्यांमधील संघर्ष वाढल्याचे दिसत आहे.
रोहित जाधव जखमी
हल्लेखोरांना रोखण्यासाठी पुढे गेलेला रोहित जाधव याच्यावरही हल्ला झाला. छातीवर आलेला वार त्याच्या दंडावर निभावला. वादग्रस्त रिल्सबद्दल २० दिवसांपूर्वीच जुना राजवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली होती.
प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित
पोलिसांनी ४५ हून जास्त सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए म्हणजे झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र, त्याला वेळेत मंजुरी मिळत नसल्याची पोलिसांची तक्रार आहे. कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन पळवाटा काढणाऱ्या गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे.