क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:12 IST2019-09-20T18:11:48+5:302019-09-20T18:12:34+5:30
कोल्हापुरातील पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबचे संस्थापक व क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर (वय ७०) यांचे निधन झाले. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.

क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापुरातील पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबचे संस्थापक व क्रिकेटपटू अविनाश सोळांकूरकर (वय ७०) यांचे निधन झाले. टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटपटू म्हणून त्यांनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे.
स्व. सागर नार्वेकर, संजय बावडेकर यांच्या संकल्पनेतून आपल्या भागातील क्रिकेटपटूंचा टेनिस क्रिकेटचा एक संघ असावा, म्हणून अविनाश यांनी १९७५ साली पॉप्युलर स्पोर्टस क्रिकेट क्लबची स्थापना केली. डावखुरा गोलंदाज, उजवा फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक म्हणून १९७५ ते १९९२ या दरम्यान अविनाश यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, कोकण, हुबळी, बेळगाव, गोवा, आदी ठिकाणची मैदाने गाजविली.
कोल्हापुरात जरी लेदरबॉलच्या क्रिकेटचा इतिहास असला तरी या क्रिकेटपटूने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या टेनिसबॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजविल्या आणि अनेक स्पर्धांचे संयोजनही त्यांनी केले होते. कोल्हापूरच्या क्रिकेट वर्तुळात एक सच्चा क्रिकेटप्रेमी हरविल्याची भावना अनेक क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त होत आहे.