Kolhapur: खिद्रापूर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे, सातव्या ते आठव्या शतकातील अद्भुत मंदिर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:32 IST2025-09-13T19:31:35+5:302025-09-13T19:32:28+5:30

मंदिराची डागडुजी करण्याची मागणी करूनही पुरातन खात्याचे याकडे दुर्लक्ष

Cracks have appeared in the stonework of the Kopeshwar temple in Khidrapur Kolhapur district | Kolhapur: खिद्रापूर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे, सातव्या ते आठव्या शतकातील अद्भुत मंदिर 

Kolhapur: खिद्रापूर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे, सातव्या ते आठव्या शतकातील अद्भुत मंदिर 

दत्तवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिराच्या दगडी बांधकामाला तडे गेले आहेत. ग्रामपंचायतीने मागणी करूनही पुरातन खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरातन खात्याने या मंदिराची डागडुजी करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे श्री कोपेश्वर महादेवाचे मंदिर आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बारीक कोरीव काम केलेले अद्भुत असे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती सातव्या ते आठव्या शतकात चालुक्य काळापासून यादव काळापर्यंत झाली असल्याची नोंद आहे. संपूर्ण दगडी कोरीव काम असून पूर्व-पश्चिम असणाऱ्या या मंदिरात स्वर्ग मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भ असे मुख्य भाग आहेत. स्वर्ग मंडप चोवीस खांबावर असून त्यावर सत्तावीस नक्षत्रांच्या देवतांची कोरीव नक्षीकाम केली आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी आहेत.

कृष्णा नदीकाठी असलेल्या या मंदिरात २००५ मध्ये महापुराचे पाणी आले होते. त्यामुळे मंदिरातील काही खांबांना तडे गेले. त्यावेळी पुरातन खात्याने स्वर्ग मंडपातील खांबांना लोखंडी पट्ट्या लावून तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र पुन्हा २०१९, २०२१ च्या महापुरामुळे मंदिरात असणाऱ्या पायालगतच्या दगडांना तडे गेले असून हे तडे पायापासून वर मंदिरापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अद्भुत लेणी काम असणाऱ्या या मंदिराला वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या मंदिर परिसरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. मात्र मंदिराच्या खांबांना व इतर ठिकाणी गेलेला तड्यावर कोणतीही काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे.

स्वर्ग मंडपावर बोजा

स्वर्ग मंडपावर वरचेवर सिमेंट काँक्रीट टाकले आहे. त्यामुळे स्वर्ग मंडपावर त्याचा बोजा पडत असून स्वर्ग मंडपातील दगडी खांबांना धोका निर्माण झाला आहे. स्वर्ग मंडपावरील सिमेंट काँक्रीटचा टाकलेला बोजा कमी करावा अशी मागणी होत आहे.

खिद्रापूर ग्रामपंचायतीने याबाबत पुरातन खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही ठोस काम झालेले नाही. मंदिराचे काम लवकरात लवकर करावे अशी आमची मागणी आहे. - सारिका कदम, सरपंच, खिद्रापूर

Web Title: Cracks have appeared in the stonework of the Kopeshwar temple in Khidrapur Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.