CoronaVirus Lockdown : अक्षयतृतियेचा मुहूर्तही गेला, सणामुळे होणारी उलाढाल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:04 IST2020-04-25T16:02:15+5:302020-04-25T16:04:53+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षयतृतियेचा सण आणि मुहूर्तही कोणत्याही शुभखरेदीविना जाणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या वर्षातल्या दोन मुहूर्तांचे दिवस कोणत्याही उलाढालीमुळे जाणार आहे.

CoronaVirus Lockdown : अक्षयतृतियेचा मुहूर्तही गेला, सणामुळे होणारी उलाढाल थांबली
कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षयतृतियेचा सण आणि मुहूर्तही कोणत्याही शुभखरेदीविना जाणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या वर्षातल्या दोन मुहूर्तांचे दिवस कोणत्याही उलाढालीमुळे जाणार आहे.
अक्षयतृतीया उद्या रविवारी साजरी होत आहे. भारतीय संस्कृतीत वर्षातील गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पाडवा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि अक्षयतृतियेचा अर्धा मुहूर्त या दिवसांना विशेष महत्त्व आहे. यानिमित्त घराघरांत देवदेवतांचे पूजन पुरणपोळी सारख्या पक्वान्नांचा आस्वाद असतो.
नव्या वस्तूंचे आगमन, कौटुंबिक उत्सव, व्यवसायाची सुरुवात, गृहप्रवेश अशा शुभ गोष्टी या दिवशी केल्या जातात. पण यंदा कोरोनाचे संकट सुरू झाले आणि सगळ््याच सणांवर संक्रांत आली. ‘लॉकडाऊन’मुळे पंधरा दिवसांपूर्वी गुढीपाडवा सणदेखील असाच मुहूर्ताच्या खरेदीविना गेला.
उद्या रविवारी अक्षयतृतीया आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अजूनही शहरातील सगळे व्यवहार ठप्प आहेत. दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचा हा सणही कोणत्याही शुभखरेदीविना व शुभकार्यांविना जाणार आहे.