corona virus : जिल्हा परिषदेच्या ठिय्या आंदोलनातील तिघेजण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:44 IST2020-08-26T17:43:29+5:302020-08-26T17:44:49+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांपैकी तिघेजण पॉझिटिव्ह आल्यामुळे इतरांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

corona virus : जिल्हा परिषदेच्या ठिय्या आंदोलनातील तिघेजण पॉझिटिव्ह
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांपैकी तिघेजण पॉझिटिव्ह आल्यामुळे इतरांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.
सर्वसाधारण सभा ऑनलाईन असली तरी विरोधी भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडीचे सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. हे सर्वजण अध्यक्षांच्या दालनाकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तेथेच त्यांनी ठिय्या मारून घोषणाबाजी सुरू केली. घोषणा, आरोप आणि भाषणे यांमुळे अनेकांनी तोंडावर मास्क लावले नव्हते. महिला सदस्य मागील बाजूला होत्या.
ही सर्व मंडळी मांडीला मांडी लावून बसली होती. चार दिवस गेल्यानंतर मात्र यातील तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिरोळ तालुक्यातील एक आणि हातकणंगले तालुक्यातील दोन सदस्य पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता इतरांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, विजय भोजे, प्रा. शिवाजी मोरे, शंकर पाटील हे सदस्य पुढच्या बाजूला होते. यामुळे या सर्वांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.