corona virus: Relief from corona, the number of patients in the district decreased | corona virus : कोरोनापासून दिलासा, जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली

corona virus : कोरोनापासून दिलासा, जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली

ठळक मुद्दे४६१ नवीन रुग्ण, तर २१ जणांचा मृत्यू आरोग्य यंत्रणेवरील ताणही होतोय कमी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याला सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत ४६१ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

जुलै, ऑगस्ट महिन्यांत समूह संसर्गाचा उद्रेक झाला होता, तो आता आटोक्यात येत असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज हजाराच्या पटीत नवीन रुग्ण आढळून येत होते; तर ३० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत होता. त्या मानाने सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे.

समूह संसर्गही आटोक्यात येत आहे. गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या नवीन ४६१ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ४० हजार २४२ झाली, तर २१ जणांच्या मृत्यूमुळे मृत होणाऱ्यांची संख्या १२७८ झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या काळात आणखी एक दिलासा देणारी घटना अशी की, जिल्ह्यात सध्या १० हजार ३८२ कोरोनाबाधित रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यातील तब्बल ६५३४ रुग्ण हे सौम्य लक्षणे असल्यामुळे घरच्या घरीच उपचार घेत आहेत; तर प्रत्यक्षात ३८४८ रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना जसा दिलासा मिळत आहे, तसाच तो आरोग्य यंत्रणेलाही मिळत आहे.

शिरोळ व गडहिंग्जलमध्ये प्रत्येकी चार मृत्यू

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मरण पावलेल्यामध्ये १५ पुरुषांचा, तर सहा महिलांचा समावेश आहे. शिरोळ व गडहिंग्लजचे प्रत्येकी चार रुग्ण उपचारांदरम्यान मृत्यू पावले. शिरोळमधील यड्राव, नांदणी, धरणगुत्ती, अब्दुललाट; तर गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, नूल, मांगनूर, जाकेवाडी येथील रुग्ण मृत झाले.

कोल्हापूर शहरातील जाधववाडी, शिवाजी पेठ, न्यू शाहूपुरी; करवीरमधील शिंगणापूर, उचगाव, पन्हाळा तालुक्यातील पोर्ले, मानेवाडी, शाहूवाडीतील डोणोली, आजऱ्यातील हारूर, इचलकरंजी शहर, शहापूर, चंदगडातील भोंजवाडी येथील रुग्ण मृत झाले आहेत.

१७९९ चाचणी अहवाल प्राप्त

गेल्या २४ तासांत १७९९ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांतील ११४२ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी ९२४ अहवाल निगेटिव्ह आले; तर २१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४५२ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी ४१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळांतील २०६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सगळीकडेच आशादायक चित्र

जिल्ह्यात सगळीकडेच आशादायक चित्र आहे. कोल्हापूर व इचलकरंजी या दोन हॉटस्पॉट बनलेल्या शहरांतील रुग्णसंख्या घटत आहे. कोल्हापूर शहरात सोमवारी केवळ १३० रुग्ण आढळून आले; तर इचलकरंजी शहरात १२ रुग्ण आढळून आले.

करवीर व हातकणंगले तालुक्यांनीही संसर्गाच्या बाबतीत आघाडी घेतली होती. तेथेही रुग्णसंख्या घटली आहे. हातकणंगलेत ५०, तर करवीरमध्ये ५४ रुग्ण नव्याने आढळून आले. शाहूवाडी ३७, पन्हाळा २५, गडहिंग्लज २०, भुदरगड येथे १७ रुग्ण आढळून आले. आजरा, राधानगरी, कागल या तीन तालुक्यांत तर हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच रुग्ण आढळून आले.

तालुकानिहाय रुग्णसंख्या -
आजरा - ७१७, भुदरगड - ९५२, चंदगड - ८६१, गडहिंग्लज - १०१७, गगनबावडा - ११९, हातकणंगले - ४४९८, कागल - १४०५, करवीर - ४५८३, पन्हाळा - १५३०, राधानगरी - १०८३, शाहूवाडी - १०५७, शिरोळ - २१४५, कोल्हापूर शहर - १२ हजार ४५५, नगरपालिका हद्द- ६२५९, इतर जिल्हा- १५८१.

  • आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या - ४० हजार २६२
  •  आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या - २८ हजार ६०२
  • मृत झालेल्या रुग्णांची संख्या - १२७८
  • उपचार घेत असलेले रुग्ण - १० हजार ३६२.

Web Title: corona virus: Relief from corona, the number of patients in the district decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.