corona virus -सांगलीच्या सराफ पेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:12 IST2020-03-21T15:57:16+5:302020-03-21T16:12:28+5:30
कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसत आहे.

corona virus -सांगलीच्या सराफ पेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प
सांगली : कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसत आहे.
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, अशी आशा असलेल्या व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे. ग्राहकांनी सराफ पेठेकडे पाठ फिरविली आहे.
गेल्या पंधरा दिवसात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाले. मध्यंतरी सोन्या-चांदीचे दर उतरूनही खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडला नाही. व्यावसायिकांच्या मते, ८० टक्के व्यवहार ठप्प झाला आहे. सांगलीच्या सराफ पेठेत दररोज ८ ते १० कोटीची उलाढाल होते. आता ही उलाढाल २० टक्क्यावर आली आहे.
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर संपूर्ण सराफ पेठच बंद ठेवावी लागणार आहे. गुढीपाडवा व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह मुहूर्तालाही सोन्या-चांदीची खरेदी होईल की नाही, याची धास्ती व्यावसायिकांना आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले कारागीर, गलाई बांधवांची आर्थिक कोंडी होणार आहे.