कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोना संसर्गामुळे दोन पुरुषांसह एक महिलेचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरच्या दोघांचा, तर एक आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील एका महिलेचा समावेश आहे. २४ तासांत १४ नव्या रुग्णांची नोंद झाली; तर २८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता सामान्य असली तरी तीन रुग्णांचा मात्र मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील ४६ वर्षीय पुरुषावर येथील सीपीआर रुग्णालयात, तर ५७ वर्षीय पुरुषाचा कोविड काळजी केंद्रात, तर आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील ५६ वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४६६ आरटीपीआर, १११ ॲन्टिजेन चाचण्या, तर खासगी रुग्णालयात १६६ चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी केवळ १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. गगनबावडा, हातकणंगले, पन्हाळा व शाहूवाडी येथील प्रत्येकी एक, तर कोल्हापूर शहरातील तीन रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. तीन रुग्ण हे नगरपालिका क्षेत्रातील, तर तीन रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात आता केवळ २३४ रुग्ण उपचार घेत आहेत.