कोल्हापुरात मिरवणुकीत ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून वाद; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:01 PM2024-05-10T13:01:10+5:302024-05-10T13:01:49+5:30

काही काळ तणाव; पाच ते सहाजण किरकोळ जखमी

Controversy over taking tractors in procession in Kolhapur; lathicharge by the police | कोल्हापुरात मिरवणुकीत ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून वाद; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

कोल्हापुरात मिरवणुकीत ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून वाद; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

कोल्हापूर : पारंपरिक शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मिरजकर तिकटी येथे ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून मंडळांमध्ये वाद झाला. मंडळांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली. गुरुवारी (दि. ९) सायंकाळी घडलेल्या घटनेत पाच ते सहाजण किरकोळ जखमी झाले. मिरवणुकीत मुद्दाम वाद निर्माण केलेल्या मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

शिवजयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी शहरातील मिरजकर तिकटी ते महाद्वार रोडवरून मंडळांनी मिरवणूक काढली. पेठांसह उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणा, विद्युत झगमगाट आणि देखाव्यांसह मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरजकर तिकटी येथे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संयुक्त सुभाषनगर, कारवान ग्रुप आणि मराठा वाॅरिअर्स ग्रुपचे ट्रॅक्टर पोहोचले. त्यावेळी ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून सुभाषनगर मंडळ आणि कारवान ग्रुपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाला सुरुवात झाली.

कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात असतानाच बंदोबस्तावरील पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर काही वेळाने खरी कॉर्नर येथे पुन्हा कारवान ग्रुप आणि मराठा वॉरिअर्सच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मंडळांना बाजूला थांबवून मिरवणूक सुरू ठेवली. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

पळापळीत कार्यकर्ते जखमी

पोलिसांनी लाठीमार करताच पळापळ झाल्याने रस्त्यात पडून चौघे किरकोळ जखमी झाले, तर एका मंडळाच्या ट्रॉलीतून उडी टाकताना दोघे जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: Controversy over taking tractors in procession in Kolhapur; lathicharge by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.