Kolhapur: शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा, पन्हाळ्याच्या शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:13 IST2024-12-13T16:12:56+5:302024-12-13T16:13:33+5:30
उपवनसंरक्षक चेन फेन्सिंगचा प्रस्ताव पाठविणार

Kolhapur: शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा, पन्हाळ्याच्या शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी
कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी, लक्ष्मी कुरणासह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुमारे ३५०० एकर शेतीच्या गव्यांमुळे झालेल्या नुकसानीला पायबंद घालण्याची मागणी उपवनसंरक्षक जी. गुरु प्रसाद यांच्याकडे केली. त्यावर यासंदर्भात या शेतकऱ्यांसाठी चेन फेन्सिंगचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी आणि लक्ष्मी कुरणासह परिसरातील ३५०० एकर शेतीमध्ये ६०० कुटुंबातील शेतकरी पूर्णपणे पावसावरच अवलंबून कायमस्वरूपी शेती करतात. पाच वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये शिरून गव्यांचे कळप शेतीपिकाचे नुकसान करत आहेत. एकावेळी सुमारे ४० ते ५० गव्यांचा कळप पिकात शिरतो. गव्यांच्या भीतीने शेतकरी, विशेषत: महिला शेतकऱ्यांनी घाबरून शेताकडे जाणे बंद केले आहे.
गव्यांच्या नुकसानीसंदर्भात वनविभागाने वेळोवेळी पंचनामे केले आहेत. परंतु नुकसानीच्या तुलनेत अतिशय अल्प स्वरूपात भरपाई मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. येथील वनविभागाच्या वनशेतीभोवती सौरकुंपण आहे, तथापि शेतकऱ्यांच्या शेतीभोवती सौरकुंपण नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी या शेतीभोवती सौरकुंपण करण्याची मागणी केली आहे.
चेन फेन्सिंगचा प्रस्ताव
जी. गुरुप्रसाद यांनी प्रति ६०० मीटरप्रमाणे सुमारे तीन किलोमीटर परिसरात चर मारण्याचा अथवा चेन फेन्सिंग करण्याचा प्रस्ताव करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च येणार असल्यामुळे त्याची तरतूद करण्यासाठी डीपीडीसी आणि राज्य सरकारकडे निधीचा प्रस्तावही डिसेंबरअखेर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन जी. गुरुप्रसाद यांनी या शेतकऱ्यांना दिले. शशिकांत पोवार, कुमार चिले, अमर जाधव, आनंदा उदाळे, प्रमोद उदाळे, तानाजी काशीद, जयसिंग उदाळे, महेश भाडेकर यांच्यासह १०० शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.