भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:22 IST2025-07-29T12:21:40+5:302025-07-29T12:22:03+5:30
ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता

भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर
कोल्हापूर : बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना विवाह योजनेचा लाभ द्यावा. व्यसनमुक्त अभियान राबवा. सुरक्षा संच, अत्यावश्यक संच योजनेची चौकशी करा. आरोग्य तपासणी योजना बंद करा. अपडेट पर्याय सुरू करा, मध्यान्ह भोजन आणि योजनेची चौकशी करा या प्रमुख मागण्यासाठी राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या जिल्ह्यातील कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. त्यामध्ये कामगार पिवळ्या रंगाच्या टोप्या घालून मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर कामगारांनी शंखध्वनी करून राज्य शासनाचा निषेध केला.
दसरा चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. काही पाऊले मोर्चा पुढे गेल्यानंतर पावसाची सुरुवात झाली. मात्र कामगार भरपावसात घोषणा देत होते. व्हिनस कॉर्नर येथेही काही कामगार सहभागी झाले. यावेळी कामगारांच्या हातात मागण्यांची शेकडो फलक होते. पिवळ्या रंगाच्या टोप्या पुरुष आणि महिला कामगारांनी परिधान केल्या होत्या.
राज्यातील तालुका सुविधा बंद करा, मध्यान्ह भोजन यंत्रणेची चौकशी करा, बांधकाम कामगारांच्या दोन मुलींना विवाह योजनेचा लाभ द्या, यासह आदींसह मागण्यांचे फलक कामगारांच्या हाती होते. कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष संजय गुदगे, अरविंद सुतार, पांडुरंग कांबळे, नारायण पाटील, रफीक जमादार, संजय धुमाळ, एकनाथ गुरव, संदीप व्हराळे, युवराज पाटील, गणेश कांबळे, यल्लाप्पा मादार, विजय भोसले आदी सहभागी झाले.
वाहतूक कोलमडली
मोर्चात शेकडो कामगार सहभागी झाले. त्यामुळे दसरा चौक, व्हिनस कार्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, कसबा बावडा रोडवर जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी सुमारे दोन तास वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते.
..काय आहेत मागण्या
- बांधकाम कामगारांच्या मंडळावर कामगार, मालक प्रतिनिधीची तत्काळ नियुक्ती करा.
- एफ ०२ ही योजना सरसकट नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करा.
- कामगारांच्या पाल्यास टॅबलेट, लॅपटॉप द्या.
- कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांना आदेश द्या.
- कामगारांच्या उपचारासाठी नोंदणी ॲक्टीव्हची अट रद्द करा.
- गृहोपयोगी वस्तू लाभ योजनेसाठी नूतनीकरणाची अट रद्द करा.
- शहरी घरकुल योजनेसाठी जाचक अटी रद्द करा
सरकाराचा प्रतीकात्मक पुतळा
कामगारांनी मोर्चात ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता. हा पुतळा ट्रॅक्टरवर झोपवून घोषणा देत निषेध केला.