कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा मजबूत; राजकीय घडामोडींचा परिणाम 

By विश्वास पाटील | Published: July 4, 2023 12:07 PM2023-07-04T12:07:12+5:302023-07-04T12:09:42+5:30

..तर ही जागा जिंकणे काँग्रेसला अवघड नाही

Congress strong claim for Kolhapur Lok Sabha seat; Effect of political events | कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा मजबूत; राजकीय घडामोडींचा परिणाम 

कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसचा दावा मजबूत; राजकीय घडामोडींचा परिणाम 

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूरलोकसभा मतदारसंघावरील राज्यातील नव्या राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसचा दावा मजबूत झाल्याचे मानले जात आहे. फक्त त्या पक्षाकडे सद्य:स्थितीत ही निवडणूक लढवायची कुणी? हाच प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीकडे आता ही जागा आम्हाला द्या, असे म्हणण्याचीही ताकद उरली नाही. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेने (ठाकरे गट) जिंकल्या होत्या; परंतु त्या पक्षाकडे उमेदवार असले तरी सहाही मतदारसंघांतील राजकीय ताकद कमी पडते.

ठाकरे गटात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे महाविकास आघाडीतून या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. त्यातील किमान कोल्हापूरची जागा तरी पक्षाला मिळावीच, असा त्यांचा दबाव होता. कारण गेल्या निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीकडे होती; परंतु आता नव्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादीची ताकदही जिल्ह्यात कमकुवत झाली आहे. त्यामुळे त्या पक्षाकडून या जागेचा आग्रह कितपत केला जातो, हा प्रश्नच आहे.

त्या तुलनेत काँग्रेस या मतदारसंघात मजबूत आहे. १९७१ पासून तब्बल सातवेळा या पक्षाकडे हा मतदारसंघ राहिला आहे. आज काँग्रेसचे सर्वश्री पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव आणि राजू आवळे हे विधानसभेचे आमदार आहेत. विधानपरिषदेत सतेज पाटील, जयंत आसगावकर आहेत. यापैकी आवळे वगळता अन्य पाचही आमदारांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर मतदारसंघात येते. आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतही पक्षाची चांगली बांधणी केली आहे.

कागलमध्येच पक्षाला तुलनेत कमी पाठबळ असले, तरी मंडलिक यांच्या विरोधातील लोकबळ तिथे मदतीला येईल. संजय घाटगे, समरजित घाटगे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. त्यापैकी आजच्या घडीला तरी संजय घाटगे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. अशा स्थितीत या मतदारसंघात काँग्रेस वादळ निर्माण करू शकते.

आता काँग्रेससाठीच... आमचं ठरू द्या...

गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ ही कॅचलाइन राज्याला देऊन शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आता तशीच ताकद त्यांनी काँग्रेससाठी लावली तर ते नक्कीच हवा निर्माण करू शकतात.

उमेदवारांचाच शोध..

आमदार पी.एन. पाटील यांच्यासारखा निष्ठावंत, विजयाची खात्री असणारा तगडा उमेदवार काँग्रेसकडे आहे; परंतु आमदार पाटील यांची लोकसभा लढवायची तयारी नाही. त्यांना सतेज पाटील यांनी लोकसभा लढवावी, असे वाटते. या दोघा मातब्बर उमेदवारांत तू..तू..-मैं..मैं.. असे सुरू आहे. या दोघांनी एकत्रित बसून ताकदीचा उमेदवार दिला आणि रान उठवले तर ही जागा जिंकणे काँग्रेसला अवघड नाही.

काँग्रेसबद्दल सहानुभूती..

शिवसेनेतील आणि आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसबद्दल जनमाणसांत पुन्हा सहानुभूती तयार होताना दिसत आहे. राष्ट्रवादीत फूट; परंतु पी.एन. आणि सतेज पाटील यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. या पक्षाचा एकही आमदार फुटला नाही, याचेही कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला संधी आहे. फक्त या दोन नेत्यांनीच मनावर घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर लोकसभेचे १९७१ पासूनचे खासदार
१९७१ : राजाराम दादासाहेब निंबाळकर (काँग्रेस)
१९७७ : दाजीबा बळवंतराव देसाई (शेकाप)
१९८० : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९८४ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९८९ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९१ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९६ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९८ : सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस)
१९९९ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)
२००४ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)
२००९ : सदाशिवराव मंडलिक (अपक्ष-काँग्रेस सहयोगी सदस्य)
२०१४ : धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
२०१९ : प्रा. संजय मंडलिक (शिवसेना)

Web Title: Congress strong claim for Kolhapur Lok Sabha seat; Effect of political events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.