'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद
By पोपट केशव पवार | Updated: September 9, 2023 18:43 IST2023-09-09T18:42:40+5:302023-09-09T18:43:47+5:30
भर पावसात काँग्रेसच्या जयजयकाराने अवघा परिसर निनादून गेला

'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद
कोल्हापूर : रिमझिम पाऊस, कैचाळ, हलगी, ढोल-ताशांचा निनाद, तरुणांचा टिपेला पोहोचलेला उत्साह, प्रत्येक चौका-चौकात होणारी पुष्पवृष्टी, औक्षण अन् 'संकटाची ना आम्हा भीती, चालत राहू, चालत राहू' या गीतातून संचारलेला उत्साह अशा भारावलेल्या वातावरणात शनिवारी कोल्हापुरातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंवाद पदयात्रेला आपटे नगरपासून सुरुवात झाली. भर पावसात काँग्रेसच्या जयजयकाराने अवघा परिसर निनादून गेला.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रा सुरू असून शनिवारी या यात्रेचे कोल्हापूर शहरात आगमन झाले. आपटेनगरच्या चिवा बाजारापासून सायंकाळी ४ वाजता या पदयात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत महिला, तरुणांची संख्या लक्षणीय होती. जनसंवाद यात्रेतील चालत राहू या गीताने प्रत्येकाचा उत्साह टिपेला पोहोचला होता.
रिमझिम पाऊस सुरू असूनही वृद्धापासून युवकांपर्यंत सगळेच उत्साहात चालत होते. या यात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. राजलक्ष्मीनगर चौकात जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रशर चौक, पांडुरंगनगरी, संभाजीनगर येथे महिलांकडून औक्षण करण्यात आले. एका रथात उभा राहिलेल्या बालचिमुकल्यांच्या विविध पोषाखांमधून समतेचा संदेश देण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, महापालिकेचे माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते