Confusion of shopkeepers and compulsion of administration persists | दुकानदारांचा संभ्रम अन् प्रशासनाची सक्ती कायम

दुकानदारांचा संभ्रम अन् प्रशासनाची सक्ती कायम

ठळक मुद्देदुकानदारांचा संभ्रम अन् प्रशासनाची सक्ती कायम सुरु झालेली दुकाने पुन्हा बंद : दोन दिवसात राज्य पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता

 कोल्हापूर : दिवसा जमावबंदी असली तरी दुकाने सुरु ठेवायची की बंद याबाबतचा शहरातील व्यापारी, दुकानदारांचा संभ्रम बुधवारीही कायम राहिला. त्यामुळे सकाळी उघडलेली दुकाने महापालिका प्रशासनाने लागलीच सक्तीने बंद पाडली. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यावरील पन्नास टक्क्याहून अधिक दुकाने बंद होती.

राज्यभर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला असून राज्य सरकारने यापूर्वी घातलेले निर्बंध अधिक कडक केले आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंद लागू करण्यात आली आहे. जमाव बंदी म्हणजे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. परंतू बाजारपेठेत हे बंधन पाळले जात नाही. त्यामुळे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

परंतु राज्य सरकारच्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थिती आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, असा निर्धार त्यांनी केला आहे. मंगळवारी त्यांचा हा निर्धार पोलिसांनी हाणून पाडला होता. सकाळी सुरु झालेली दुकाने दुपारी पोलिसांनी संचलन करुन बंद ठेवण्यास भाग पाडले.

त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. बुधवारी सकाळी सुध्दा पालकमंत्र्यांना तशी विनंती करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवदेन द्या, असे सुचविले. त्यानुसार निवेदन देण्यात आले. तुमची भावना राज्याच्या मुख्य सचिवांच्या कानावर घालतो, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
 

Web Title: Confusion of shopkeepers and compulsion of administration persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.