Kolhapur- Leopard attack news: बिबट्याचा हल्ला की घातपात, संभ्रम कायम..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:30 IST2025-10-21T12:30:04+5:302025-10-21T12:30:25+5:30
कंक दाम्पत्य मृत्यू प्रकरणाचा गुंता बनतोय किचकट

Kolhapur- Leopard attack news: बिबट्याचा हल्ला की घातपात, संभ्रम कायम..
आंबा : बिबट्याच्या हल्ल्यात कंक दाम्पत्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वन विभाग व पोलिस विभाग यांनी सोमवारी तपास सुरु ठेवला. मात्र या प्रकरणातील गुंता वाढला असून पोलिस व वनखाते एकमेकांकडे बोट करीत असल्याने या प्रकरणाचा उलघडा आव्हान बनले आहे.
गोलीवणे वस्तीपासून सहा किलोमीटर दूर निर्जन धरणकाठी झोपडी करून राहिलेल्या निनू यशवंत कंक व पत्नी रखुबाई यांचा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची फिर्याद मुलगा सुरेश कंक यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली. पण, वन विभागाने जंगली प्राण्यांचा हल्ला साफ नाकारला आहे.
रविवारी सायंकाळी घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर दोघांचे मृतदेह रात्री आठला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले. पण, पोलिस यंत्रणेने अचानक कोल्हापूरला मृतदेह इन कॅमेरा विच्छेदनास रवाना केले. त्यामुळे मृतदेहांसाठी नातेवाइकांना चौवीस तास तिष्ठत बसावे लागले. सोमवारी दुपारी साडेतीनला मृतदेह गोलीवणे वसाहतीमध्ये आणला. विविध गावांत विस्थापित झालेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मृतदेह दारात उतरताच कुटुंबीयांसह नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.
साेमवारी घटनास्थळी भेट दिली असता, घटनास्थळाच्या पूर्वेला दहा फुटांवरील महाबळ फार्म हाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात एल.सी.बी.चे तपास पथक कार्यरत होते. दरम्यान, श्वान पथकही पाचारण करून तपास केला. एल.सी.बी. पथक प्रमुख पी.एस.आय. पाटील यांनी अद्याप फुटेजमध्ये संशयास्पद काही आढळले नसल्याचे सांगितले. पुणे येथील वरिष्ठ कार्यालयातून शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला की, या प्रकरणाची दिशा स्पष्ट होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. प्रथमदर्शनी रखुबाईंच्या चेहरा व मानेवर खाेलवर जखमा दिसत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, निनू यांच्या अंगावर जखमा दिसत नसल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संभ्रम व्यक्त केला.
दरम्यान, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनीही रखुबाईंवर प्राण्याने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. शवविच्छेदनाच्या अहवालावर तपासाची दिशा ठरेल, असा दुजोराही त्यांनी दिला.
वन विभाग व पोलिसांचे परस्परविरोधी मत
बिबट्याने हल्ला केल्याचे वन विभाग स्पष्ट नाकारत आहे. रखुबाईंच्या केसांचा एकत्रित पडलेला पुंजका, एक डावा हात व उजवा पाय, असे परस्परविरोधी अवयव प्राणी ठरवून तोडतो का ? शिवाय पती निनूचा मृतदेह झोपडीपासून साठ मीटरवरील जलाशयात कसा परफडत नेला ? तसे असेल तर जखम कशी नाही, हे संशयास्पद चित्र असल्याचे म्हणणे वनाधिकाऱ्यांचे आहे. याउलट पोलिस अधिकारी मात्र प्राण्यांचा हल्ला असल्याचे सांगत आहेत. दोन्ही विभाग परस्परविरोधी भूमिका मांडत असल्याने या मृत्यू प्रकरणाचा गुंता वाढला आहे.
प्रकल्पग्रस्त वसाहतीवर स्मशान शांतता...
प्रत्येक सणाला आई-वडील घराला पाय लावून जायचे. दिवाळीला घरी या म्हणून सुरेश सांगून आला होता. पण, ऐन दिवाळीत आई-वडीलांचा मृतदेह पाहण्याची वेळ कंक कुटुंबीयांवर आली.
संभम्र निर्माण करणारे काही प्रश्न
- गोळीवणे येथील घटना जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाली नसावी, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
- या परिसरात जंगली प्राण्यांच्या पाऊलखुणा किंवा अस्तित्वाचे पुरावे मिळालेले नाहीत.
- दोन्ही व्यक्तींचे मृतदेह ४०० ते ५०० मीटर अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत.
- प्राण्यांनी हल्ला केल्याचे ठोस पुरावे प्रथमदर्शनी सापडत नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- घातपाताची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. त्यामुळे कंक दाम्पत्याचा मृत्यू नेमका कधी झाला? याचे कोडे सुटलेले नाही.
- दोन्ही मृतदेहांमध्ये एवढे अंतर कसे काय? ही घटना निदर्शनास येण्यास एवढा उशीर का झाला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे.
- मृतदेहांचा व्हिसेरा आणि फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतरच या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.