Leopard in Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:39 IST2025-11-13T12:38:07+5:302025-11-13T12:39:13+5:30
वनविभागाची माहिती : किरकोळ जखमींना पन्नास हजारांपर्यंत वैद्यकीय खर्च

Leopard in Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची भरपाई
कोल्हापूर : शासनाच्या वनविभागाकडूनबिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना पाच लाख तर किरकोळ जखमीस वैद्यकीय खर्च देण्याची तरतूद आहे. जखमींपैकी तिघांपर्यंत वन प्रशासन जाऊन पोहचले आहे. जखमी बाळू हुंबे यांच्याकडे गुरूवारी वनअधिकारी जाणार आहेत.
मंगळवारी बिबट्या ताराबाई पार्क परिसरात आला. त्यावेळी बाळू अंबाजी हुंबे (मूळ गाव : गगनबावडा, सध्या रा. भोसलेवाडी, कोल्हापूर), शाहूपुरीचे पोलिस कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिध्दू खोंदल ( रा. भोसले पार्क, कदमवाडी, कोल्हापूर), वन कर्मचारी ओंकार काटकर (रा. पंचगंगा तालमीजवळ, कोल्हापूर) यांच्यावर हल्ला केला. यातील हुंबे गंभीर जखमी आहेत. या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वनविभागाच्या नियमाप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास सात लाख ५० हजार रूपये आणि गंभीर जखमीस पाच लाख, किरकोळ जखमीस वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळते. मृत्यू झाल्यास २५ लाखांची भरपाई नातेवाईकांना मिळते. यासाठी नातेवाईकांना वन प्रशासनाकडे वेळेत अर्ज करावे लागणार आहे. जखमी रुग्णालयात दाखल असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी वन प्रशासनाशी संपर्क साधून भरपाईसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.