कंपनीच्या कर व्यवस्थापकाने चुकवला २१ कोटींचा जीएसटी, मुंबईतील मयांक पटेल यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:54 IST2025-09-24T11:53:35+5:302025-09-24T11:54:45+5:30

ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील विशेष गुप्तचर पथकाने केली

Company's tax manager evaded GST worth Rs 21 crore Mayank Patel from Mumbai arrested | कंपनीच्या कर व्यवस्थापकाने चुकवला २१ कोटींचा जीएसटी, मुंबईतील मयांक पटेल यांना अटक

कंपनीच्या कर व्यवस्थापकाने चुकवला २१ कोटींचा जीएसटी, मुंबईतील मयांक पटेल यांना अटक

कोल्हापूर : मुंबईतील वेलनेस हेल्थटेक कंपनीचा करप्रणाली व्यवस्थापक मयांक मुकेश पटेल (वय ३९, रा. डोंबिवली पश्चिम, ठाणे) याला २१ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अटक केली. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील विशेष गुप्तचर पथकाने केली.

मुंबईतील विक्रोळी येथे वेलनेस हेल्थटेक कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत मयांक पटेल हा करप्रणाली व्यवस्थापक पदावर काम करीत होता. या कंपनीकडून करचुकवेगिरी झाल्याची माहिती विशेष गुप्तचर पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर कार्यालयातील पथकाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी विक्रोळी येथे छापा टाकून कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये करप्रणाली व्यवस्थापक पटेल याने कंपनीच्या कागदपत्रांद्वारे बनावट खरेदी-विक्री केल्याचे दाखवून आठ कोटी रुपये कर चुकवल्याचे निदर्शनास आले. 

तसेच त्याने स्वतःची एक कंपनी कागदोपत्री सुरू केली होती. त्या कंपनीकडून १३ कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाल्याचे तपासणीत समोर आले. याबाबत गुप्तचर अधिकाऱ्यांनी पटेल याला नोटिस देऊन चौकशीसाठी कोल्हापूरला बोलावले होते. मंगळवारी त्याची अधिक चौकशी करून अटकेची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांचा सहभाग असावा, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सीपीआर रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपी पटेल याची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली. केंद्रीय जीएसटी विभागातील वरिष्ठ गुप्तचर अधिकारी सूरज पवार, अभिजित भिसे, सौरभ पवार यांच्यासह अमितकुमार जयस्वाल, अविनाश सूर्यवंशी आणि हिमांशू आहुजा यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Company's tax manager evaded GST worth Rs 21 crore Mayank Patel from Mumbai arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.