CPR Hospital Kolhapur : परिचारिकांच्या सेवेला समाजाचा सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 18:54 IST2021-05-12T18:51:41+5:302021-05-12T18:54:42+5:30
CPR Hospital Kolhapur : कुटुंबातील सदस्याप्रमाणेच अहोरात्र रुग्णांच्या सेवेचे व्रत जपणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांवर बुधवारी जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या सेवाव्रती भावनांना उजाळा देत समाजातील अन्य घटकांनीही त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याने परिचारिकांना आनंदाचे भरते आले.

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित होत असतानाच बुधवारी साजऱ्या झालेल्या जागतिक परिचारिकादिनी सीपीआरमधील परिचारिकांनी रुग्ण सेवा करत करत सेल्फी घेत आनंद द्विगुणित केला (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : कुटुंबातील सदस्याप्रमाणेच अहोरात्र रुग्णांच्या सेवेचे व्रत जपणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांवर बुधवारी जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या सेवाव्रती भावनांना उजाळा देत समाजातील अन्य घटकांनीही त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याने परिचारिकांना आनंदाचे भरते आले.
आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा केला. कोल्हापुरातही बुधवारी सीपीआरमध्ये मुख्य कार्यक्रम झाला. कोरोनासारख्या साथीच्या आजारामध्ये परिचारिकांचे आरोग्य व्यवस्थेतील योगदान सर्वसामान्यांना अधिक जवळून कळाल्याने यावर्षीच्या या कौतुक सोहळ्याला आदरयुक्त किनार लाभली. परिचारिकांनी आपापसात शुभेच्छा देत, सेल्फी काढत हा दिन साजरा केला तर समाजातील अन्य संवेदनशील वर्गाने त्यांच्या कार्याचा उजाळा म्हणून स्टेटस ठेवून, फोनवरून शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला.
सीपीआरमध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये बुधवारी नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याप्रमाणे वाटचाल करण्याची शपथ घेण्यात आली. अधिसेविका बी. एस. मोमीन यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. मंदाकिनी पाटील, सी. पी. साळोखे, नेहा कापरे यांच्यासह परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
परिचारिका क्षेत्रात मक्तेदारी, शासनाचे दुर्लक्ष, प्रचंड ओढाताण असली तरी देखील परिचारिका असल्याचा मला सार्थ गर्व आहे. या व्यवसायानेच मला वेगवेगळे अनुभव दिले, स्वावलंबी जगता आले.
-माधुरी हळबे,
अधिपरिचारिका, सीपीआर