कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्याचा आयुक्तांनी मागवला अहवाल, चौकशी समितीही नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:35 IST2025-08-27T18:34:18+5:302025-08-27T18:35:12+5:30

चारही विभागांतून काय मागवले ?

Commissioner seeks report on 100 crore road in Kolhapur will also appoint an inquiry committee | कोल्हापुरातील शंभर कोटींच्या रस्त्याचा आयुक्तांनी मागवला अहवाल, चौकशी समितीही नेमणार

संग्रहित छाया

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची चौकशी करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी चारही विभागांतील रस्त्यांचा अहवाल तातडीने मागवला आहे. झालेले काम, अपूर्ण काम, सध्याची रस्त्याची स्थिती याचा अहवाल घेऊन येत्या दोन दिवसांत समिती स्थापन करून चौकशी केली जाणार आहे.

कोल्हापूर शहरातील रस्ते निकृष्ट असल्याच्या तक्रारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंभर कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना सोमवारी कोल्हापुरात दिले होते. त्यानुसार प्रशासकांनी शहर अभियंता व उपअभियंत्यांची बैठक घेऊन चारही विभागातील रस्त्यांचा अहवाल तातडीने देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल तपासणीसाठी पुण्याच्या सीओपीला (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) पाठवला जाणार आहे.

चारही विभागांतून काय मागवले?

शंभर कोटी रुपयांमधून कोणते रस्ते झाले, कोणत्या रस्त्यासाठी किती खर्च आला, झालेल्या रस्त्याची सध्याची स्थिती काय, रस्ते अपूर्ण असतील तर त्याचे कारण काय, संबंधित ठेकदार, किती कालावधीत रस्ता पूर्ण केला याची इंत्थंभूत माहिती प्रत्येक विभागातील उपअभियंत्यांकडून मागवण्यात आली आहे.

पुढे काय होणार?

प्रशासक के. मंजुलक्ष्मी मुंबईला गेल्या आहेत. त्या कोल्हापुरात आल्यानंतर या रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती नेमली जाणार आहे. या समितीला चाैकशीसाठी ठराविक कालावधी दिला जाणार आहे.

महापालिकेच्या चारही विभागांतील झालेल्या रस्त्यांच्या कामाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. - रमेश मस्कर, शहर अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका.

Web Title: Commissioner seeks report on 100 crore road in Kolhapur will also appoint an inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.