सुधीर फडकेंवर चित्रपट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:20 PM2018-11-25T23:20:02+5:302018-11-25T23:20:32+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती ...

Coming to Sudhir Fadkeen Film | सुधीर फडकेंवर चित्रपट येणार

सुधीर फडकेंवर चित्रपट येणार

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू केली जाणार आहे. कोल्हापूरच्या या सुपुत्राची अलौकिक कामगिरी चित्रपटबद्ध करण्यासाठीची प्राथमिक तयारीही सुरू झाली आहे. त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनीच कोल्हापुरात रविवारी ही माहिती दिली.
कोल्हापूरमध्ये २५ जुलै १९१९ रोजी जन्मलेले रामचंद्र फडके हेच पुढे सुधीर फडके या नावाने लोकप्रिय झाले. अतिशय गरिबी, टप्प्याटप्प्याने होत गेलेली प्रतिकूल परिस्थिती, त्यातूनच उत्तर भारतामध्ये गाण्याचे कार्यक्रम करून झालेला उदरनिर्वाह आणि पुन्हा कोल्हापुरात आल्यानंतर पाध्येबुवांच्या या निष्ठावान शिष्याने घेतलेली झेप हा सर्व प्रवास सुधीर फडके यांनी आपल्या अर्धवट राहिलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रामध्ये मांडला आहे.
मात्र ‘वीर सावरकर’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी त्यांनी आपले आत्मचरित्राचेही काम मागे ठेवले. २९ जुलै २00२ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले; मात्र एकूणच थक्क करणारा त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रूपाने रसिकांसमोर आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.
फडके यांचे आत्मचरित्र अपुरे असल्याने त्यांच्या मोठ्या प्रवासाची पुन्हा मांडणी करावी लागणार आहे. ही जबाबदारी अर्थातच त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनाच देण्यात आली आहे; त्यामुळे ही माहिती एकत्रित करणे, त्याच्या संदर्भांची खात्री करणे हे काम सुरू झाले आहे.
प्रखर राष्ट्रभक्त आणि सच्चा गायक, संगीतकार अशी प्रतिमा असलेल्या या स्वरतीर्थाचा चित्रपटाच्या माध्यमातून दाखविला जाणारा प्रवास निश्चित सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली नसली, तरी असा चित्रपट होऊ घातला आहे, हीदेखील रसिकांसाठी आनंदवार्ताच आहे.


बाबूजींच्या जीवनकार्यावर चित्रपट काढला जाणार आहे. काही मंडळींनी याबाबत तयारी सुरू केली आहे. अपुऱ्या आत्मचरित्रानंतरची माहिती मला जेवढी आहे, तेवढी मी देणार आहे. बाबूजींनी विविध क्षेत्रांत एवढं मोठं काम केलं, त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या टोकाच्या बºयावाईट घटना घडल्या, की त्यांची निवड करणेही कठीण होत आहे.
- श्रीधर फडके, गायक, संगीतकार

Web Title: Coming to Sudhir Fadkeen Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.