Leopard in Kolhapur: भेदरलेल्या पालकांचा मुलांना फोन... कुठं हाईस तू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:28 IST2025-11-12T12:27:42+5:302025-11-12T12:28:04+5:30
काका सोडा की आमचे घर येथे आहे ओ...!, महाविद्यालयाच्या परिसरात पालकांची घालमेल

Leopard in Kolhapur: भेदरलेल्या पालकांचा मुलांना फोन... कुठं हाईस तू?
कोल्हापूर : ‘अरे बिबट्या आला...पळा,’ अशा आरोळ्या आणि पोलिसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ पाहून या परिसरातील विवेकानंद महाविद्यालयातीलविद्यार्थी अक्षरश: भेदरलेले होते. भेदरलेल्या चेहऱ्याने वर्गखोल्यांची खिडकी, व्हरांड्यातून बिबट्याचा थरार पाहत होते. तर महाविद्यालयाच्या परिसरात पालकांची घालमेल सुरू होती.
ताराबाई पार्क परिसरात बिबट्या घुसल्याचे समजताच मंगळवारी सगळा परिसर तब्बल साडेतीन तास भीतीच्या छायेखाली होता. या परिसरात सिंचन भवन, महावितरण, आरटीओ कार्यालयासह विवेकानंद महाविद्यालय आहे. महाविद्यालयात एक हजाराहून अधिक विद्यार्थी होते. परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे समजताच, महाविद्यालय प्रशासनाची काळजी वाढली. महाविद्यालयाचे सर्व गेट बंद करून विद्यार्थ्यांना वर्गखोलीतच बसवले. कर्मचारी गेटवर थांबून परिस्थितीचा अंदाज घेत होते.
तीन तास हा थरार सुरू राहिल्याने महाविद्यालय सोडायचे तरी कसे? असा प्रश्न प्रशासनासमोर होता. दरम्यानच्या कालावधीत आपल्या पाल्याच्या काळजीपोटी अनेक पालक महाविद्यालयाच्या परिसरात येऊन थांबले होते. परिसरात बघ्यांची गर्दी, पोलिसांसह महापालिका कर्मचाऱ्यांची पळापळ पाहून विद्यार्थी काहीसे भेदरलेले दिसत होते. अशा परिस्थितीत आपल्या मुलगा, मुलगी घाबरलेली नसेल ना? या काळजीने पालकांची घालमेल पाहावयास मिळाली.
काका सोडा की आमचे घर येथे आहे ओ...!
दुपारी कॉलेजमधून घरी आलेल्या मुलींना आपल्या परिसरात एवढी गर्दी का? हेच समजत नव्हते. गर्दीतून वाट काढत मुली घामाघूम होत गल्लीपर्यंत पोहोचल्या; पण तिथे पोलिस बंदोबस्त पाहून त्या काही अस्वस्थ दिसत होत्या. त्यातून घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर ‘काका सोडा की आमचे घर येथे आहे ओ...’ अशी मुली म्हणाल्या. पण, ‘बाळांनो तुमच्या घराजवळच बिबट्या आहे, तिकडे लांब थांबा,’ असे पोलिसांनी सांगताच, कुटुंबाच्या चिंतेने त्यांच्या मनात घालमेल झाली.
महाविद्यालयात दुपारपर्यंत परीक्षा सुरू होत्या, त्यामुळे मुले वर्गातच होती. बिबट्याला जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत मुलांना सोडू नका, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली होती. दुपारी बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावर काहीही परिणाम झाला नाही. - डॉ. रमेश कुंभार (प्राचार्य, स्वामी विवेकानंद महाविद्यालय)