बाप्पाच्या आधीच नारळ भडकला; दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:16 IST2025-08-08T17:15:39+5:302025-08-08T17:16:34+5:30
आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : ग्लोबल वॉर्मिंगचा फटका यंदा नारळाला बसला आहे. दक्षिण भारतातून येणाऱ्या नारळाला कीड लागल्याने यंदा उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे चढ्या दराने नारळ विकले जात आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
कोल्हापुरात तामिळनाडू आणि कर्नाटक येथून येणारी नारळाची आवक एकदम कमी झाली आहे, त्यामुळे किरकोळ नारळविक्रीचा दर २५ रुपयांवरून ३५ ते ४० रुपये नग झाला आहे. आवक घटल्यामुळे नारळाचे दर यंदा श्रावणापूर्वी दोन महिने आधीच वाढले आहेत. गौरी-गणपतीचा सण तोंडावर असून, या काळात हा दर वाढलेला असून दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नारळाची सुमारे ६० ते १०० टन आवक होते. यंदा ती गतवर्षीपेक्षा जास्त असली तरी मुळातच आवक कमी झाल्याने नारळाचा तुटवडा आहे. कोकणातही रोज ५०० पोती नारळ कोल्हापुरातून जातो. घाऊक बाजारात नारळ ५ ते १५ रुपयांना मिळत होते. किंमतही १५ रुपयांपेक्षा जास्त वाढत नव्हती.
याउलट, सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या नारळाची किमान किंमत ३० रुपये आणि मोठ्या म्हणजे जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कोठारी’ नारळाची किंमत आता बाजारात ६० ते ६५ रुपये झाली आहे. एका आठवड्यात नारळाच्या किमतीत प्रतिकिलो सात रुपयांनी वाढ झाली आहे.
आम्हांला जेवणात ओले खोबरे घालायला आवडते. नारळाचे दर वाढल्याने वापरावर मर्यादा आल्या आहेत. - सरिता जाधव, सोन्यामारुती चौक, कोल्हापूर.
गेल्या काही वर्षांत किमती सातत्याने वाढत असल्या तरी, नारळाची किंमत अभूतपूर्व पातळीवर पोहोचल्या आहेत. याचा फटका सामान्य व्यक्तीला बसत आहे. - अविनाश नासिपुडे, नारळ व्यापारी, महापालिका चौक, कोल्हापूर.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा नारळाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने इतर राज्यांवरील भार वाढला आहे. त्याचा फटका नारळविक्रीवर झाला आहे.- निखिल बेंडके, नारळ व्यापारी, लक्ष्मीपुरी