कोल्हापुरातील राजारामपुरीत भरदिवसा दोन टोळ्यांत राडा; एडके नाचवत पाठलाग, नागरिकांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 16:45 IST2026-03-27T16:42:59+5:302026-03-27T16:45:15+5:30
या घटनेने गुंडांच्या टोळीयुद्धाचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

संग्रहित छाया
कोल्हापूर : राजारामपुरी येथील सातव्या गल्लीत गुरुवारी (दि. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. हल्लेखोरांनी एडके नाचवत काही तरुणांचा पाठलाग केल्याने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचताच गुंडांनी पळ काढला. या घटनेने गुंडांच्या टोळीयुद्धाचा धोका पुन्हा एकदा स्पष्ट झाला.
टेंबलाई नाका आणि राजारामपुरीतील गुंडांच्या टोळ्यांमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाद धुमसत आहे. वाद मिटविण्यासाठी गुरुवारी सायंकाळी दोन्हीकडील काही तरुण राजारामपुरीतील सातव्या गल्लीत एकत्र आले होते. चर्चा करताना वादाला तोंड फुटले. त्यातून दोन्ही टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. धक्काबुक्कीनंतर काही जणांनी एडके काढून एकमेकांचा पाठलाग सुरू केला. भरदिवसा गर्दीत एडके नाचवत पाठलाग सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाहनांच्या गर्दीत एका टोळीतील तरुण पळून केले. काही वेळात राजारामपुरी पोलिस घटनास्थळी पोहोचताच जमाव करून थांबलेल्या तरुणांनी पळ काढला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नाही.