कोल्हापूर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडरची साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सर्व कंपन्यांच्या गॅस एजन्सीमधील सिलिंडर साठ्यांच्या तपासणीचे आदेश दिले. सिलिंडरचा अतिरिक्त साठा आढळल्यास कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. दुसरीकडे गॅस कंपन्यांनी एकदा सिलिंडर घेतल्यानंतर २१ दिवसांनीच दुसरा सिलिंडर बुक करता येईल, अशी व्यवस्था लावली आहे.आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा परिणाम पेट्रोल, डिझेल, तसेच एलपीजी गॅस सिलिंडर अशा जीवनावश्यक वस्तूंवर होणार आहे. त्याची सुरुवात म्हणून आताच घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे गॅस एजन्सी, तसेच नागरिकांनीही गॅस सिलिंडरच्या साठवणुकीला सुरुवात केली आहे. हे लक्षात येताच जिल्हा पुरवठा कार्यालयाने सोमवारी गॅस एजन्सीच्या तपासणीचे आदेश दिले आहे.याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची तपासणी केली जाणार असून, त्यांच्याकडे सध्या असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या साठ्याची नोंद घेतली जाणार आहे. अतिरिक्त साठा आढळल्यास एजन्सीवर कारवाई केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा शिल्लक असल्याचे पुरवठा कार्यालयाने सांगितले असले, तरी काही ठिकाणी नागरिक गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या दारासमोर रांगा लावत आहे. सोमवारी अनेक एजन्सीसमोर टाक्या घेऊन नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर मर्यादा
सध्या जिल्ह्यात ४५ दिवसांचा गॅस सिलिंडरचा साठा आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत काही अडचणी येणार नाहीत. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडर देण्यावर मर्यादा घातल्या जाणार आहेत. सध्या शासनाने साठवणुकीत असलेले व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करा त्यानंतर मात्र व्यावसायिक सिलिंडर दिले जाऊ नयेत, असे निर्देश जिल्हा पुरवठा कार्यालयांना दिले आहेत.बुकिंगवर आली मर्यादा..आतापर्यंत घरगुती गॅस सिलिंडरसाठी कधीही बुकिंग करता येत होते; पण युद्ध सुरू झाल्यापासून गॅस कंपन्यांनी बुकिंगवर मर्यादा आणल्या आहेत. एकदा सिलिंडर घेतल्यानंतर २१ दिवसांनीच ग्राहकाला मोबाइलवरून सिलिंडर बुक करता येणार आहे.
- जिल्ह्याला गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्या : बीपीसीए, एचपीसीएल, आयुसीएल
- जिल्ह्याला रोज लागणारे गॅस सिलिंडर : ९ हजार
- जिल्ह्यातील गॅस एजन्सीची संख्या : ५४
- घरगुती गॅस सिलिंडरचा पूर्वीचा दर : ८६० रुपये (घरपोहोचसाठी ८७०)
- आताचा दर : ९२० रुपये (घरपोहोचसाठी ९३०)
Web Summary : Kolhapur grapples with potential LPG shortages due to stockpiling fears amid international tensions. Authorities inspect gas agencies, limiting cylinder bookings to once every 21 days. Price hikes add to citizen concerns.
Web Summary : अंतर्राष्ट्रीय तनाव के बीच जमाखोरी के डर से कोल्हापुर में एलपीजी की कमी। प्रशासन ने गैस एजेंसियों का निरीक्षण किया और सिलेंडर बुकिंग 21 दिनों में एक बार सीमित कर दी। मूल्य वृद्धि से नागरिकों की चिंता बढ़ी।