कोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:53 IST2018-09-21T16:46:50+5:302018-09-21T16:53:08+5:30
कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या नोटीसीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

कोल्हापूर शहरातील मुलांचा जन्मदर वाढला, रुग्णालयांना नोटिसा
कोल्हापूर : शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या नोटीसीमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालयात प्रसूत झालेल्या बालकांची नोंदणी महानगरपालिका जन्म - मृत्यू नोंदणी विभागाकडे झाली आहे. माहे आॅगस्ट २०१८ या महिन्यातील जन्म नोंदणी अहवालाची पडताळणी केली असता, काही रुग्णालयात जन्माला येणाऱ्या पुरुष अपत्यांच्या संख्येच्या तुलनेत स्त्री अपत्यांची संख्या कमी असल्याची बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे.
शहरातील एका रुग्णालयात आॅगस्ट २०१८ मध्ये पुरुष अपत्य ३२, तर स्त्री अपत्य २४ जन्माला आली आहेत. अशीच परिस्थिती शहरातील अनेक रुग्णालयांत आढळून आली आहे. ही बाब चिंताजनक असून, लिंग गुणोत्तराचे प्रमाण अधिक व्यस्त होत आहे. या मागील कारणमीमांसाबाबत लेखी खुलासा करावा म्हणून डॉ. पाटील यांनी शहरातील १६ हून अधिक रुग्णालयांना नोटिसा पाठविल्या आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या पत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. एकीकडे सोनोग्राफी तपासणी, लिंग तपासणी याला शहरात पूर्णत: बंदी असताना आणि अशी सर्व मशिन्स जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडली गेली असताना, अशा प्रकारे सरसकट डॉक्टरांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. अशा नोटिसा पाठविण्यापेक्षा ज्यांच्याकडे सोनोग्राफी मशिन्स आहेत, त्यांच्यावरच अधिक नियंत्रण ठेवावे, अशी सूचना पुढे आली आहे.
सांगली शहरातील गणेशनगर येथे अलिकडेच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या हॉस्पिटलवर छापे टाकून त्यांना अटक केली होती. या चौगुले डॉक्टर दांपत्यांचा कोल्हापूर शहर परिसरातील काही डॉक्टरांशी कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी शहरातील काही रुग्णालयात जन्मलेल्या अपत्यांची माहिती घेऊन, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला असता, ही चिंताजनक बाब समोर आली; त्यामुळे त्यांनी नोटीस अस्त्र उगारले आहे.