Kolhapur Crime: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका
By उद्धव गोडसे | Updated: February 18, 2026 12:49 IST2026-02-18T12:48:38+5:302026-02-18T12:49:34+5:30
मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत होती. पण,

Kolhapur Crime: मुलांना डोळ्यात साठवत डोळे मिटले..आई-बापाच्या वादात मुलं झाली पोरकी; हुबाळे कुटुंबाची शोकांतिका
उद्धव गोडसे
कोल्हापूर : प्रेमविवाहानंतर १३ वर्षांनी कौटुंबिक वादाचे निमित्त ठरले अन् रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा जीव गेला. आई जिवानिशी गेली आणि वडील तुरुंगात गेल्याने १२ वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षीय मुलगा आई-वडिलांच्या मायेला पोरके झाले. शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या हुबाळे कुटुंबीयांच्या शोकांतिकेने शहरात हळहळ व्यक्त आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सोन्या मारुती चौकात राहणाऱ्या गणेश हुबाळे याचा बिंदू चौकात फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये नेत्यांना फेटे बांधण्यात पटाईत असलेल्या गणेशची राजकीय वर्तुळात उठबस असते. गंगावेशीतील भाचीच्या माध्यमातून त्याची राजोपाध्येनगर येथे राहणाऱ्या स्वाती दगडू भाट या तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. स्वातीच्या घरच्यांचा विरोध असतानाही पळवून नेऊन त्याने तिच्याशी विवाह केला. माहेरच्या नातेवाईकांचा विरोध डावलून प्रेमविवाह केल्याने स्वातीला माहेरची वाट तुटली. दोन मुलं झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील विरोध मावळला आणि माहेरी येणे-जाणे सुरू झाले.
गेल्या तीन-चार वर्षांपासून या दाम्पत्यात वाद सुरू झाला. पतीचे काही महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा स्वातीचा आरोप होता. यातून त्याने सोन्याची चेन विकल्याचा आणि एक प्लॉट विकल्याचे तिने आईला सांगितले. मुलगी परिणीती आठवीत, तर मुलगा शिवम पाचवीत शिकतो. दोघेही शिवाजी पेठेतील शाळेत जातात. मुलांच्या भविष्यासाठी ती पतीच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत होती. पण, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिने पतीला जाब विचारला.
वाचा: पत्नीच्या हाती 'तो' व्हिडिओ लागला, जाब विचारल्याने गळा दाबला; अटकेतील पतीची कबुली
याच रागातून त्याने सात फेब्रुवारीच्या रात्री गळा दाबला. श्वासनलिका आणि स्वरयंत्र दबल्याने ती मरणाच्या दारात पोहोचली. नऊ दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मुलांकडे पाहून तिचे डोळे भरून येत होते, पण कंठातून शब्द फुटत नव्हते. अखेर मुलांना डोळ्यांत साठवत तिने डोळे मिटले.
मुलांवर आभाळ कोसळले
आईच्या मृत्यूमुळे मुलांवरील मायेचे छत्र हरवले. यातच वडिलांना अटक झाल्यामुळे ते आई-वडिलांना पोरके झाले. सध्या ते सोन्या मारुती चौकात आजीकडे राहत आहेत. काही दिवसांत त्यांच्यासाठी सगळं जग बदललं. त्यामुळे त्यांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही.