मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ४ जूनला कोल्हापुरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:13 IST2023-05-30T14:12:56+5:302023-05-30T14:13:28+5:30
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संभाव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ४ जूनला कोल्हापुरात
कोल्हापूर : राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत कोल्हापुरात ४ जून रोजी होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध शासकीय योजनांसाठी पात्र ठरलेल्या संबंधित लाभार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ९५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. हा नियोजित दौरा २८ मे रोजी होता; परंतु नवीन संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमामुळे तो लांबणीवर पडला होता.
प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून संबंधित लाभार्थ्याला शंभर टक्के लाभ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना कांबळे यांनी या बैठकीत दिल्या.
या बैठकीत तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार करवीर १० हजार, गगनबावडा ४ हजार, शिरोळ १० हजार, हातकणंगले १० हजार, पन्हाळा ८ हजार, शाहूवाडी ८ हजार, कागल ८ हजार, राधानगरी ८ हजार, आजरा ८ हजार, भुदरगड ७ हजार, चंदगड ७ हजार आणि गडहिंग्लज ७ हजार याप्रमाणे लाभार्थींचे उद्दिष्ट आहे.